आयुष्‍य म्‍हणजे क्रिकेटच्या धावांसारखेच...

तेजश्री कुंभार
रविवार, 8 मार्च 2020

पणजीः डोक्‍यावर टोपी, शर्टाच्‍या दंडांना अगदी मुलांसारख्‍या घातलेल्‍या घड्या आणि हातात बॅटसह ती मैदानात उतरायची. नाव विश्रांती नाईक असले तरी तिला सर्वत्र दादू म्‍हणून ओळखायचे. दादू मैदानात उतरली की केवळ चौकार आणि षटकारांची बरसातच.

पणजीः डोक्‍यावर टोपी, शर्टाच्‍या दंडांना अगदी मुलांसारख्‍या घातलेल्‍या घड्या आणि हातात बॅटसह ती मैदानात उतरायची. नाव विश्रांती नाईक असले तरी तिला सर्वत्र दादू म्‍हणून ओळखायचे. दादू मैदानात उतरली की केवळ चौकार आणि षटकारांची बरसातच.

नव्‍वदीच्‍या दशकात महिलांच्‍या आयुष्‍याभोवतीची हरएक चौकट तोडून विश्रांती यांनी राष्‍ट्रीय स्‍तरावर ६ क्रिकेट, ४ सॉफ्‍टबॉल, ७ बेसबॉल आणि २ कराटेच्‍या स्‍पर्धांत कामगिरी दाखविली. त्‍यांच्‍याजवळचे क्रिकेटचे ज्ञान आता त्‍या मुलींना देतात. शिवाय महिलांना दुचाकीचे प्रशिक्षणही देतात. आपले आयुष्‍य म्‍हणजे कोणाच्‍या हातातील वस्‍तू नसून आपलीच बॅट, आपलेच मैदान आणि आपण काढणाऱ्‍या धावासारखेच असून मैदानापर्यंत जाण्‍याचा संघर्ष प्रत्‍येकीने करायला हवा, असा संदेश महिलादिनी त्‍यांनी दिला.

लहानपणापासून मी मुलांच्‍यात अधिक खेळत असे. त्‍यामुळे मुलांच्‍या आवडीचा क्रिकेट खेळ मलाही आवडू लागला. क्रिकेट खेळायला जाताना मला म्‍हैशींची कामे करून, घरातील कामे आवरून जायला लागे. वास्‍को येथून पणजी येथे सराव करण्‍यासाठी सकाळी सातच्‍या आत पोहचावे लागे आणि त्‍यानंतर दहा वाजता पुन्‍हा वास्‍कोला परतावे लागे. मला मिळणाऱ्‍या प्रशस्‍तीपत्रांचे भावाला कौतुक होते म्‍हणून त्‍याने मदतही केली. भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रवेश प्रक्रिया तेव्‍हा माहीत नव्‍हती अन्‍यथा मी नक्‍कीच या संघात खेळले असते, असे विश्रांती म्‍हणाल्‍या.

माझे शिक्षण १० वीपर्यंत झाले, पुढील शिक्षण अपुरे राहिले. मात्र, आजुबाजूची स्‍थिती पाहून आयुष्‍याला दिशा देण्‍याचे कसब आत्‍मसात करावे लागले. आताच्‍या मुलांच्‍या हातात लहान वयात मोबाईल आल्‍याने त्‍यांची एकाग्रता हरवते. खेळ असो वा शिक्षण एकाग्रता महत्त्‍वाची असल्‍याचा संदेश त्‍यांनी दिला. गेल्‍या दहा वर्षांपासून विश्रांती वास्‍को येथील ड्रायव्‍हर हिल येथे महिलांना दुचाकीचे प्रशिक्षण देतात.

‘जबाबदारी‍ पेलण्यासाठी पुरूषच असावे लागत नाही’

भाऊ लवकर गेल्‍याने आईवडिलांना मला सांभाळावे लागले. खेळ मागे पडला आणि जबाबदारी अंगावर आली. वेळप्रसंगी भाजी विकली, नारळ विकले, मिळेल ती कष्‍टाची कामे केली आणि त्‍यांचा सांभाळ केला. आयुष्‍यातील प्रत्‍येक जबाबदारी कोणत्‍याही तक्रारीविना पेलली. कारण माझ्‍या मते जबाबदारी पेलण्‍यासाठी तुम्‍ही पुरुष असावे लागत नाही. मी हे धडे माझ्‍याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्‍यांनाही दे असल्‍याचे विश्रांती नाईक म्‍हणाल्‍या.

‘लग्‍न म्‍हणजे सर्वस्‍व नाही’

मुलीने जन्‍म घेतला तर तिने लग्‍न करावेच, असे अजिबात नाही. मला लग्‍न करावेसे वाटले नाही, त्‍यामुळे मी केले नाही. मुलीच्‍या आयुष्‍यात लग्‍न म्‍हणजे सर्वस्‍व नाही. लग्‍न करून अथवा न करता इतरांवर अवलंबून आयुष्‍य जगणे मात्र नक्‍कीच चुकीचे असून प्रत्‍येक महिलेने स्‍वावलंबी असायलाच हवे, असे विश्रांती नाईक यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या