मुरगावात ९ लाखांची दारू जप्त

dainik gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

मुरगावात ९ लाखांची दारू जप्त 

पणजी,

राज्यात टाळेबंदीच्या काळात मद्य विक्रीला बंदी असताना काही भागात चोरून मद्याची विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती मिळवून आज मुरगाव येथील एका मद्य विक्रेत्यांच्या निवासस्थानी छापा टाकून सुमारे ९ लाखांची दारू जप्त केली व परवाना निलंबित केला. या टाळेबंदीच्या काळात अबकारी खात्याने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ११ मद्य विक्री परवाने रद्द केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुरगाव येथील एक मद्य विक्रेता दुकानातील दारू घरी आणून बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी खात्याच्या आयुक्तांनी एक विशेष पथक तयार करून सकाळीच ही कारवाई केली. अबकारी खात्याच्या पथकाला पाहून या मद्य विक्रेत्याचे धाबेच दणाणले. पथकाने निवासस्थानाची झडती घेतली असता
दारूची ३१९ खोके सापडले. या कारवाईनंतर अबकारी खात्याने घाऊक व किरकोळ मद्य विक्रेत्यांची सर्व दुकाने, गोदामे तसेच मद्य निर्मिती युनिटस् सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांना टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यास संधी मिळू नये. कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता कारवाई करण्यात आलेल्या मद्य विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करून पुढील चौकशी केली जाणार आहे. टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री होत असल्याची त्याची माहिती नागरिकांनी या खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन खात्याचे आयुक्त अमित सतिजा यांनी नागरिकांना केले आहे.

 

 

संबंधित बातम्या