शिरगाववासीय पाणी प्रश्नावरून आक्रमक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

डिचोलीः थकीत पाण्याच्या बिलांवरून खनिज वाहतुकीला लागलेले ग्रहण सुटले असे वाटत असतानाच, याप्रश्नीम दिशाभूल झाल्याचा दावा करीत, संतप्त शिरगाववासीयांनी पुन्हा 'एल्गार' पुकारला आहे. आज (शनिवारी) शिरगावच्या लोकांनी परत एकदा रस्त्यावर उतरत पैरा येथे चौगुले खाणीवरील ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक रोखून धरली.

डिचोलीः थकीत पाण्याच्या बिलांवरून खनिज वाहतुकीला लागलेले ग्रहण सुटले असे वाटत असतानाच, याप्रश्नीम दिशाभूल झाल्याचा दावा करीत, संतप्त शिरगाववासीयांनी पुन्हा 'एल्गार' पुकारला आहे. आज (शनिवारी) शिरगावच्या लोकांनी परत एकदा रस्त्यावर उतरत पैरा येथे चौगुले खाणीवरील ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक रोखून धरली.

स्थानिक पंचायतीच्या पाठिंब्याने शिरगावमधील जवळपास दोनशे नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर दिवसभर खनिज वाहतूक बंद ठेवावी लागली. या आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जोपर्यंत पाण्याचा प्रश्नी सोडवण्यात येणार नाही, तोपर्यंत खनिज वाहतूक करायला देणार नाही. असा ठाम पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. सरपंच सदानंद गावकर, उपसरपंच विजया मांद्रेकर आणि अन्य पंच या आंदोलनात सहभागी झाले होते.

नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे खनिज वाहतुकीला पुन्हा एकदा ग्रहण लागले आहे. संबंधित खाण कंपन्यांनी थकीत असलेली पाण्याची बिले अगोदर भरणा करावी. आणि नंतरच खनिज वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करीत शिरगावच्या नागरिकांनी गेल्या सोमवारी (ता.२०) खनिज वाहतूक रोखून धरली होती. मात्र, नंतर डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शिष्टाई करून लोकांची समस्या सोडवण्याचे समाधानकारक आश्वासन दिल्यानंतर त्यावेळी शिरगावचे लोक शांत झाले होते. त्यांनी आपला आंदोलनाचा पवित्रा मागे घेतल्यानंतर मंगळवारपासून खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.

त्यामुळेच नागरिक आक्रमक
पाणी बिलांच्या या मुद्यावर सोमवारी डिचोली येथे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्यासमवेत शिरगावचे नागरिक, पंचायत आणि खाण कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीस नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याप्रश्नी सुवर्णमध्य काढण्यात येईल. जिल्हा मिनरल निधीतून आवश्य क ती उपाययोजना करण्यात येईल. पाण्याच्या बिलांचा भरणा होईपर्यंत नळजोडण्यात तोडण्यात येणार नाहीत. असे आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले होते. मात्र, पाण्याच्या बिलांचा विषय बैठकीतील ठरावात नोंद केलेला नाही. असा दावा करीत शिरगाववासीय पुन्हा आक्रमक बनले आणि त्यांनी आज रस्त्यावर उतरून पुन्हा खनिज वाहतूक रोखून धरली.

सकाळी शिरगाव येथील श्री लईराई मंदिराजवळ नागरिक जमले. नंतर या नागरिकांनी पैरा येथे मोर्चा वळवून खनिज वाहतूक रोखून धरली. तासभर वाहतूक रोखून धरल्यानंतर नागरिकांनी चौगुले खाणीवरील प्लांटच्या दिशेने कूच करून ट्रकांनी खनिज न भरण्याची ताकीद शॉवेल ऑपरेटर आणि कर्मचाऱ्यांना दिली. या आंदोलनावेळी दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिस वा सरकारी अधिकारी त्या ठिकाणी फिरकले नाहीत. मात्र, नंतर पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्यासह मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलक नागरिकांशी चर्चा केली. याप्रश्नी  तोडग्यासाठी सोमवारी (ता. २७) डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

शिरगाव भागातील जलस्त्रोते नामशेष झाल्याने या गावातील घरगुती नळांच्या पाण्याची बिले चौगुले, बांदेकर आणि सेझा खाण कंपन्याकडून भरण्यात येत आहेत. मात्र खाणीं बंद झाल्यापासून जवळपास दोन वर्षे होत आली, संबंधित खाण कंपन्यांनी पाण्याची बिले भरलेली नाहीत. बिलांच्या थकीत रकमेचा आकडा १९.७५ लाख असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. बिलांची थकीत रक्क म भरणा करा. अन्यथा नळजोडण्या तोडण्यात येतील. अशा नोटिसा पाणी पुरवठा खात्याने नागरिकांना दिल्या आहेत. या नोटिशीमुळे स्थानिक अस्वस्थ तेवढेच आक्रमक बनले आहेत. याच मुद्यावरून गेल्या सोमवारी पैरा-शिरगाव जंक्शनवर खनिज वाहतूक रोखून धरली होती.

गेल्या अकरा वर्षांपासून शिरगावमधील ३७१ नळजोडण्यांची पाणी बिले चौगुले, सेझा आणि बांदेकर या खाण कंपन्या भरीत आल्या आहेत. मात्र, आता खाणबंदीचे निमित्त करून पाणी बिले भरण्यास
टाळाटाळ करण्यात आली आहे. हा विषय उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असून, नागरिक सकारात्मक तोडग्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती सरपंच सदानंद गावकर यांनी दिली. एकतर खाणींमुळे गावातील जलस्त्रोते नष्ट झाली असून, आता पाण्याची बिलेही भरण्याच्या बाबतीत कंपन्या कानावर हात ठेवत आहेत. हा शिरगाववासियांवर अन्याय आहे, असे श्री. गावकर म्हणाले. नळजोडण्या तोडल्या, तर आम्ही पाणी कोठून आणायचे. असा प्रश्ने ज्येष्ठ महिला चंद्रावती गावकर यांनी उपस्थित केला. 

बिले भरीत नाहीत, तर आमचे पूर्वापार पाणी आम्हाला द्या, अशी मागणीही त्यांनी केली. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब न करता खनिज वाहतूक करण्यात येत आहे. या प्रकाराबाबतीत नागरिक आता गप्प बसणार नाहीत, असा सूचक इशारा अजय गावकर यांनी दिला. या मुद्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत खनिज वाहतूक करण्यास देणार नाही. अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे या समस्येवर आता काय तोडगा निघतो, त्याकडे शिरगाववासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

संबंधित बातम्या