बेळगावातील संचारबंदीचा भाजीपुरवठ्यावर परिणाम नाही.

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

बेळगावातील संचारबंदीचा भाजीपुरवठ्यावर परिणाम नाही

पणजी,

बेळगावातील संचारबंदीमुळे घाऊक भाजी मार्केट सीलबंद करण्यात आले असले तरी त्याचा परिणाम फलोत्पादन महामंडळाच्या भाजीपुरवठ्यावर होणार नाही. आठवड्यातून तीन दिवस भाजीपुरवठा करण्यात येणार आहे. या भाजीपुरवठ्यात खंड पडू नये म्हणून महामंडळाचे अधिकारी बेळगावात भाजी खरेदीसाठी प्रयत्नरत असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी या प्रतिनिधीला दिली. 
देशात कोविड - १९ संदर्भात दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत असल्याने व काही दिवसांपूर्वी गोव्याला भाजीपुरवठा होणाऱ्या मार्केटात कोरोना बाधित कामगार सापडल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी भाजी मार्केट परिसर सीलबंद करून हे मार्केट मोकळ्या जागेमध्ये हलविण्यात आले आहे. या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने बेळगावातील मुख्य भाजी मार्केटचा परिसरच पूर्ण सीलबंद केला आहे व त्यामुळे भाजीपुरवठा बंद होण्याच्या वृत्ताने गोव्यात खळबळ माजली होती. त्यामुळे काहींनी काल रात्री भाजी विक्रेत्यांकडे रांगा लावल्या होत्या. आज सकाळीही काहीजणांनी भाजी विक्रेत्यांकडे रांगा लावल्या होत्या. मात्र, मुबलक प्रमाणात गोव्यात भाजीपुरवठा झाल्याचे कळल्यावर अनेकांनी सुस्कारा सोडला. 
गोवा फलोत्पादन महामंडळातर्फे सध्या आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला पुरवठा राज्यातील सुमारे १२०० भाजी विक्री केंद्रावर केला जातो. त्यामुळे या केंद्रांनी दोन दिवसांसाठी पुरवठा करून ठेवताना भाजीची मागणी दुप्पट केली आहे. त्यामुळे महामंडळाला नेहमीपेक्षा दुप्पट भाजीपुरवठा करावा लागत आहे. राज्यात बेळगावातील भाजी मार्केट इतर ठिकाणी हलविण्यात आले तेथे जाऊन या महामंडळाचे अधिकारी भाजी खरेदी करत आहेत. ही भाजी खरेदी करताना कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. किमान २०० टन भाजी खरेदी केली जात आहे. भाजीपुरवठा खंडित होऊ नये याची योग्य ती सावधगिरी घेण्यात येत आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. 
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातून भाजीपुरवठा बंद होण्याच्या वृत्तामुळे काल रात्री लोकांनी काही भाजी विक्रेत्यांकडे रांगा लावल्या
व दिवसभराची उरलेली भाजीही खरेदी केली. काही भागातील खासगी भाजी विक्रेत्यांनीही आज भाज्यांचे दर वाढवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, फलोत्पादन महामंडळाच्या भाजी केंद्रावर भाजीचा पुरवठा झाल्याचे लक्षात आल्यावर काहींनी भाजीचे दर काही प्रमाणात कमी केले. फलोत्पादन महामंडळाने भाजीपुरवठा सुरू केल्यापासून खासगी भाजी विक्रेत्यांच्या भाज्यांचे दरही काही प्रमाणात नियंत्रणाखाली आले आहेत. 
अनेकांनी रस्त्याच्या बाजूला भाजी विक्री सुरू केली आहे. अनेक शहरातील भाजी मार्केट बंद असल्याने या भाजी विक्रेत्यांचा व्यापार
पूर्ण ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांनी सकाळी गाडीतून भाजी व फळे आणून रस्त्याच्या बाजूला प्लास्टिकच्या बास्केटमध्ये ठेवून त्याची विक्री करत आहे. मात्र, या विक्रेत्यांनी भाजीचे दर फलोत्पादन महामंडळातील किंमतीपेक्षा दिडपट किंवा दुप्पटीने वाढून त्याची विक्री करत आहेत. बेळगावातील कोरोना विषाणूचे रुग्णाच्या प्रकरणामुळे भाजीपुरवठा गोव्याला केव्हाही बंद होऊ शकतो. त्यामुळे नेहमीच चिंता असल्याने भाजी विक्री करत आहेत. 

संबंधित बातम्या