लॉकडाऊनचा सदुपयोग... बॅडमिंटनपटू रितेश रंगला कलांगणात

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

रितेशने गतवर्षी गोव्याचे राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. तो १९ वर्षांखालील वयोगटात खेळला होता. राज्य पातळीवरील तो सक्रिय बॅडमिंटनटू आहे.

किशोर पेटकर

पणजी ,

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे आळसावण्याऐवजी वेळेचा सकारात्मक सदुपयोग करणारे भरपूर आहेत, त्यापैकी एक रितेश नाईक हा बॅडमिंटनपटू आहे. केपे येथील हा मुलगा गोव्याचा राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनपटू असून अष्टपैलू कलाकारही आहे.

लॉकडाऊनमुळे क्रीडापटू घरातच अडकले आहेत. त्यांचा सराव बंद झाला आहे. या कालावधीत रितेशने आपल्यातील सुप्त कलाकारास जागृत केले. तंदुरुस्तीवर भर देत त्याने आपले छंदही जोपासले. लॉकडाऊनमुळे बॅडमिंटन खेळणे किंवा सरावावर निर्बंध आहेत, त्यामुळे निराश न होता, आपण अन्य छंद-आवडी जोपासल्या, त्याद्वारे आनंद लुटला. वेळेचा सदुपयोग केला, असे रितेश याने नमूद केले.

रितेशने गतवर्षी गोव्याचे राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. तो १९ वर्षांखालील वयोगटात खेळला होता. राज्य पातळीवरील तो सक्रिय बॅडमिंटनटू आहे. आल्तिनो येथील गोवा संगीत महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. त्याला संगीतात रुची आहेच, शिवाय चित्रकलेतही त्याने पारंगतता मिळविली आहे. ``लॉकडाऊन कालावधीमुळे माझ्यातील कलाकार आणखीनच विकसित होण्यास मदत झाली,`` असे रितेश म्हणाला.

गायन ही रितेशची मुख्य आवड आहे. गायनाव्यतिरिक्त वेगवेगळी वाद्ये वाजविण्यात रितेशचा हातखंडा आहे. तबला, घुमट, शमेल, तासो ही गोमंतकीय पारंपरिक वाद्ये तो अगदी सहजतेने वाजवतो. हार्मोनिका (माऊथऑर्गन), ड्रम बीट बॉक्स/क्लॅप बॉक्स ही वाद्येही तो सराईतपणे वाजवतो. सुंदर चित्रे रेखाटून त्यात रंग भरण्याव्यतिरिक्त मानवी चेहरे रंगविण्याची कलाही रितेशने आत्मसात केली आहे. रितेश व त्याच्या सहकाऱ्यांनी `अनप्लग्ड व्हायब्ज` या संगीत गटाची निर्मिती केली असून लॉकडाऊन उठल्यानंतर गोव्यातील पारंपरिक लोकगीतांचा व्हिडिओ आल्बम काढण्याचे नियोजन आहे. यंदाच्या शिगम्याच्या कालावधीत आल्बम प्रकाशित करण्याचे नियोजन होते, पण कोरोना विषाणू महामारीमुळे संबंधित काम लांबले, असे रितेशने सांगितले.

``रितेश अष्टपैलू आहे. बॅडमिंटन चांगले खेळतो, त्याची अन्य छंदातील पारंगतता थक्क करणारी आहे. चित्रकला, गायन, वाद्य वादन यात त्याचा हातखंडा आहे. अभियनयाचीही त्याला आवड आहे,`` असे या नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेल्या अष्टपैलूचे कौतुक करताना  गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले.

 

``वाद्य वादनात मी शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेले नाही. थोरल्या भावाकडून प्रेरणा घेतली. माझ्या कलागुणांना पालकांनी सुरवातीपासूनच खतपाणी घातले. त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले नसते, तर मी संगीतक्षेत्रात वाटचाल राखूच शकलो नसतो. त्यामुळे मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन.``

-रितेश नाईक

संबंधित बातम्या