कोविडला रोखण्यात टाळेबंदीचे यश

Dainik Gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

देशात आज २३ हजाराहून अधिक कोरोना संसर्गाचे रुग्ण आहेत. ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे काही काळ तरी वाढतच राहणार आहेत. परंतु या वाढीचा दर, वेग काय आहे यावर खरी सद्यस्थिती आणि भविष्याचा अंदाज येणार आहे.

अवित बगळे
पणजी

 केंद्र सरकारने कोविड १९ विषाणूचा प्रसार करण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम आता जाणवू लागले आहेत. टाळेबंदीच्या सुरवातीच्या १४ दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण जास्त होते ते १४ दिवसांच्या टाळेबंदीनंतर घटत गेले आहे. भारतीय माहिती सेवेतील माजी अधिकारी गोपाल चिपलकट्टी यांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे.
केंद्र सरकारचे वार्तापत्र तयार करण्यासाठी ते दररोज जागतिक आरोग्य संघटनेचे संकेतस्थळ पाहतात आणि त्यावरील रुग्णांची आकडेवारी नोंदवून घेतात. या नोंदी करतानाच त्यांना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याचे जाणवले आणि त्यांनी ती माहिती गोमन्तकला उपलब्ध केली. 
त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात आज २३ हजाराहून अधिक कोरोना संसर्गाचे रुग्ण आहेत. ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे काही काळ तरी वाढतच राहणार आहेत. परंतु या वाढीचा दर, वेग काय आहे यावर खरी सद्यस्थिती आणि भविष्याचा अंदाज येणार आहे. मृत्यूची संख्या एक ते सहा आठवडे रुग्णालयात खितपत असणाऱ्यांमधून वाढणार आहे. म्हणून कल दाखवायला निरूपयोगी आहे. तिच्यातील दररोजीची वाढही एक ते सहा आठवडे जून्या रुग्णांविषयीची माहिती देते. परंतु दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ती संख्या वाढण्याचा किंवा कमी होण्याचा दर हाच अर्थपूर्ण निष्कर्षासाठी महत्वाचा ठरतो. काल देशराभरात १ हजार ६८४ नवे कोरोना संसर्गाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. पण हा आकडा फार मोठा भासत असला तरी यातच आजवरचे यश स्पष्ट दिसते.
२२ मार्च रोजी नव्या रुग्णांची संख्या ८८ होती. ती एका दिवसात १३२ झाली. २४ मार्चला टाळेबंदी सुरु झाली. हा आकडा दुपटीहून कमी किंवा जवळपास म्हणता येईल. पुढच्या सहा दिवसात तो दुप्पट  म्हणजे २५५ झाला. त्यानंतरच्या तीन दिवसात एक एप्रिलला तो पून्हा दुप्पट म्हणजे ५६५ झाला. पाच एप्रिलला चार दिवसानंतर तो पुन्हा दुप्पट म्हणजे १ हजार ७३ झाला. आता हे लक्षात येईल की टाळेबंदी सुरु होण्याआधी दररोज किंवा दिवसाआड दुप्पट रुग्ण दाखल होत होते. टाळेबंदीच्या पहिल्या १४ दिवसात तीन वेळेला नव्याने येणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली. मात्र एकदा टाळेबंदीचे पहिले १४ दिवस संपल्यानंतर आजपर्यंत आजपर्यंत ही संख्या दुप्पट होऊ शकली नाही. गेले २० दिवस ही संख्या दुप्पट होऊ शकली नाही. चढउतार झाले आहेत पण ते १ हजार ५०० पर्यंत. पण आता १ हजार ७०० पर्यंतच अडकलेले आहेत. घरातच स्वतःला कोंडून घेण्याऱ्या कोट्यावधी भारतीय जनतेने विश्वास, जिद्द, सचोटी आणि सहनशीलनतेने मिळवलेले हे यश आहे. सरकारचे निर्णय कोरोनाच्या अग्रणी सेनानायकांचे (आपल्या डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, पोलिस, बॅंक कर्मचारी आदींचे) हे यश आहे.

जगातील इतर देशांची तुलना केली तर इटलीत मार्चच्या ४ तारखेला ५८७ असलेले नवे दैनंदिन रुग्ण मार्चला ७ रोजी दोन दिवसात १ हजार २४७ (तिप्पट) झाले. मार्च ११ रोजी २ हजार ३१३, मार्च १८ रोजी ४ हजार २०७, मार्च २१ रोजी ६ हजार ५५७ रुग्ण दाखल झाले. आज इटलीत १ लाख ९० हजार एकूण रुग्ण आहेत. अमेरीकेची स्थिती याहून फारच निराशाजनक आहे. 
गोपाळ चिपलकट्टी

तारीख  वाढलेले रुग्ण  किती दिवसांत    दुप्पटीचे दिवस             कलावधी
२२ मार्च          ८८      एका दिवसांत      एका दिवसांत                 टाळेबंदीपूर्व
२३ मार्च         १३२      एका दिवसांत      एका दिवसांत                टाळेबंदीपूर्व
२९ मार्च         २५५     सहा दिवसांत      सहा दिवसांत      टाळेबंदी पहिले १४ दिवस
१ एप्रिल          ५६५     तीन दिवसांत      तीन दिवसांत      टाळेबंदी पहिले १४ दिवस
५ एप्रिल        १०७३    चार दिवसांत     चार दिवसांत         टाळेबंदी पहिले १४ दिवस
८ एप्रिल         ११२७     तीन दिवसांत     दुप्पट नाही        टाळेबंदीच्या १४ दिवसानंतर
१४ एप्रिल       १२११      सहा दिवसांत       दुप्पट नाही     टाळेबंदीच्या १४ दिवसानंतर
१९ एप्रिल       १३३४      पाच दिवसांत     दुप्पट नाही       टाळेबंदीच्या १४ दिवसानंतर
२० एप्रिल        १५५३     एका दिवसांत     दुप्पट नाही     टाळेबंदीच्या १४ दिवसानंतर
२४ एप्रिल        १६८४   चार दिवसांत        दुप्पट नाही      टाळेबंदीच्या १४ दिवसानंतर

संबंधित बातम्या