लॉकडाऊन तरी गोव्यात रेव्ह पार्ट्या

dainik gomantak
मंगळवार, 28 एप्रिल 2020
लॉकडाऊन तरी गोव्यात रेव्ह पार्ट्या 

पणजी,

राज्यात टाळेबंदी असताना हरमल समुद्रकिनारी डोंगराळ भागामध्ये विदेशी नागरिकांनी पेडणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाईट रेव्ह पार्टी केली व त्याचा मागमूसही पोलिसांना लागू दिला नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले व त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
राज्यात सर्वत्र टाळेबंदी असताना विदेशी नागरीक हरमलच्या डोंगरामध्ये पोहोचले कसे? या नागरिकांसाठी ही पार्टी एका स्थानिकानेच आयोजित केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी ही पार्टी झाली, त्या वटवृक्षाखालील जागा रेव्ह पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असून विदेशी नागरिकही अशीच जागा शोधतात. त्यांना एकांतात या पार्ट्या करायच्या असल्याने स्थानिकच त्यांना मदत करतात. या विदेशी नागरिकांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. जी वाहने घेऊन ते डोंगरात गेले होते त्याचे काही क्रमांक पोलिसांना चौकशीत उघड झाले आहेत. त्याच्या मदतीने या नागरिकांचा शोध घेऊन त्याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, विदेशी नागरिक पोलिसांना गुंगारा देऊन अशा रेव्ह पार्ट्या करत असल्याने ही चिंतेची बाब आहे.
गेल्या आठवड्यात काही विदेशी नागरिक भाडेपट्टीवर दुचाकी घेऊन हरमल समुद्रकिनारी भागातील डोंगराळ परिसरात गेले. दुचाकी जाते त्यापर्यंत ते वाहन घेऊन गेले व त्यानंतर ते चालत जंगलात गेले. त्यानंतर रात्रभर नाईट पार्टी करून हे विदेशी नागरीक सकाळी परतले. या घटनेची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यावर पेडणे पोलिस खडबडून जागे झाले. पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व निरीक्षक संदेश चोडणकर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली होती. त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली. नागरिकांनी कोठे पार्टी केली ती जागा दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शोधली. त्या ठिकाणी पोलिसांना ड्रग्ज किंवा मद्याच्या बाटल्या सापडल्या नाहीत. मात्र या नाईट पार्टीसाठी ड्रग्ज व मद्याचा सर्रास वापर करण्यासाठीच अशा निर्जनस्थळी ती आयोजित केली होती.

 

संबंधित बातम्या