बदलत्या अभ्यासक्रमाचे "अपडेट" विद्यार्थ्यांना विद्यालयांनी देत रहावे..!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना द्या
सभापती राजेश पाटणेकर; कुडणे महालक्ष्मी हायस्कूलचे स्नेहसंमेलन

महालक्ष्मी विद्यालयातर्फे गौरविण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांबरोबर सभापती राजेश पाटणेकर. बाजूस सखा मळीक, संतोष मळीक, उदय मळीक, शिवाजी मळीक, मधु मळीक व मान्यवर.

साखळी : आज शिक्षणात आमुलाग्र बदल झालेला आहे. वेळोवेळी अभ्यासक्रमांत बदल होत राहतो. या होणाऱ्या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना देणे हे प्रत्येक विद्यालयाचे कर्तव्य आहे, असे उद्‌गार सभापती राजेश पाटणेकर यांनी काढले.

कुडणे येथील महालक्ष्मी शैक्षणिक संस्था संचलित महालक्ष्मी हायस्कूलच्या व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ आणि विद्यार्थी वर्ग यांच्या सहयोगाने द्विवार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून कुडणेचे समाज कार्यकर्ते सखा मळीक, महालक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रा. संतोष मळीक, उपाध्यक्ष सुरेश (दत्ता) मळीक, सचिव शिवाजी मळीक, सहसचिव प्रा. गुरुदास मळीक, संस्थापक सदस्य मधु मळीक, वासुदेव मळीक, जयेश मळीक, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उदय मळीक, विद्यालयाचे मुख्याध्यापक नीलेश गुणाजी, माजी विद्यार्थी प्रतिनिधी नवीन फाळकर आणि सदानंद मळीक उपस्थित होते.

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात भाषेबद्दल कसल्याच अडणी येत नाहीत. आपल्या पाल्याच्या सुवर्ण भविष्यासाठी आपल्या गावातील विद्यालयातूनच शिक्षण देण्याचा संकल्प पालकांनी करावा. तसे केल्यास विद्यार्थ्यांचा वेळही वाचेल व दूरवर जाण्याचे कष्टही पडणार नाहीत. आपल्या गावातील शाळेचे नाव करण्याची जबाबदारी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे.

कुडणेसारख्या खेड्यातील महालक्ष्मी विद्यालयाने आपल्या स्वकर्तृत्वाने व उत्तम निकाल देण्याच्या परंपरेने पालकांच्या मनातील शहरातील विद्यालयांबद्दल असलेल्या ओढीला छेद दिलेला आहे. त्यासाठी महालक्ष्मी विद्यालयाचे शिक्षक आणि महालक्ष्मी शैक्षणिक संस्था खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहे, असेही सभापती पाटणेकर म्हणाले.

सखा मळीक यांनी महालक्ष्मी विद्यालय दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के अविरत देत आल्याबद्दल महालक्ष्मी विद्यालयातील मुख्यध्यापक व शिक्षक यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयाने आपल्या निकालाची उज्वल परंपरा अबाधित राखत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्याची विनंती केली.

यावेळी विविध क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. माजी विद्यार्थ्यांमधून माजी सैनिक अमर मळीक, मामलेदार अनंत मळीक, डाॕ. महादेव गावस, डाॕ. प्रविण मळीक, डाॕ. विजय मळीक, डाॕ. विद्या मळीक, डाॕ. जयराज मळीक, डॉ. नवनाथ मांद्रेकर, पोलिस उपनिरिक्षक प्रगती मळीक, गौरेश मळीक, योगेश खांडेकर, लक्ष्मण गावस यांचा गौरव करण्यात आला. तसेच विश्वेश फात्रेकर आणि अर्जुन गावस या शिक्षकांचा चांगल्या कार्याबद्दल मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन शहिदा आगा, अजीता जयानंद, बाबला मळीक, सोनिया डेगवेकर, सेजा डायस, स्वाती मळीक यांनी केले, तर आभार कुंदन गावस यांनी मानले.

‘विप्रो अर्थियन’ स्पर्धेत
विद्यालय सलग चारवेळा अजिंक्य

विप्रो कंपनीतर्फे आयोजीत ‘विप्रो अर्थियन’ स्पर्धेत कुडणेतील महालक्ष्मी विद्यालयाने सलग चारवेळा प्रथम पारितोषिक पटकावले आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन कौतुकास पात्र ठरतात. याचा अभिमान कुडणेतील प्रत्येक नागरिकांनी बाळगावा, असे आवाहन सभापती राजेश पाटणेकर यांनी केले.

संबंधित बातम्या