मजुरांच्या पाठवणीसाठी डिजिटल प्रणालीचा वापर

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

उत्तर प्रदेशासाठी 187, बिहारसाठी 44, मध्य प्रदेशासाठी 30, राजस्थानसाठी 13 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.

मुंबई

परराज्यांतील मजुरांना परत पाठवण्यासाठी नॅशनल मायग्रंट्‌स इन्फॉर्मेशन सिस्टम (एनएमआयएस) या डिजिटल यंत्रणेचा वापर केला जाणार असून, त्यासाठी दीड हजार मंत्रालयीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्यात अद्याप चार लाख मजूर मूळ गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी 260 श्रमिक रेल्वेगाड्यांची आवश्‍यकता असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एनएमआयएस प्रणालीमुळे राज्य सरकार, रेल्वे व इतर यंत्रणामध्ये चांगला समन्वय राहण्यास मदत होईल. डिजिटल पद्धतीने माहिती जतन करणे व तात्काळ मिळवणेही शक्‍य होणार आहे. राज्यातून 325 रेल्वेगाड्यांतून परप्रांतीय मजूर परत गेले आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत 385 गाड्यांमधून पाच लाख मजुरांना त्यांच्या मूळ राज्यांत पाठवण्याचे नियोजन आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

उत्तर प्रदेशासाठी 187, बिहारसाठी 44, मध्य प्रदेशासाठी 30, राजस्थानसाठी 13 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. राज्यातील आणखी चार लाख मजूर त्यांच्या गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी आणखी 260 श्रमिक रेल्वेगाड्यांची आवश्‍यकता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. परराज्यात मजुरांना पाठवण्याचे काम अधिक समन्वय साधून करण्यात येईल. त्यामुळे मनुष्यबळ व ऊर्जेचीही बचत होईल, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला. 

1421 मंत्रालयीन कर्मचारी तैनात
मुंबईतील परप्रांतीयांना पाठवण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती. पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत सहपोलिस आयुक्त विनय चौबे व उपसचिव राहुल कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या मदतीसाठी 1421 मंत्रालयीन कर्मचारी देण्यात आले आहेत. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी जारी केला. या समितीमध्ये 40 वर्षांखालील कर्मचाऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या