परदेशातून मुंबईत आल्याचा पश्‍चात्ताप

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि क्वारंटाईन व्यक्तींची संख्या अधिक, त्यामुळे खोल्यांची साफसफाई दररोज होत नाही.

मुंबई

मुंबईतील तारांकित हॉटेलांत अनेक गैरसोई असल्यामुळे हाल होत असल्याच्या तक्रारी परदेशांतून आलेल्या क्वारंटाईन व्यक्तींनी केल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईत आल्याबद्दल पश्‍चात्ताप होत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहेत. 
लंडनहून आल्यानंतर सांताक्रूझ येथील तारांकित हॉटेलात क्वारंटाईन झालेल्या महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला रविवारी घरी पाठवण्यात आले. या काळातील अनुभवांबाबत त्यांनी  संवाद साधला. "मी 14 दिवसांपूर्वी लंडनहून विमानाने मुंबईत उतरलो. हा प्रवास साडेसात तासांत झाला; मात्र विमानतळावरून सांताक्रूझमधीलच हॉटेलात जाण्यासाठी साडेसहा तास लागले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि क्वारंटाईन व्यक्तींची संख्या अधिक, त्यामुळे खोल्यांची साफसफाई दररोज होत नाही. मी स्वत:च झाडलोट केली आणि ओल्या फडक्‍याने लादी पुसून घेतली. पलंगावरील चादर पाच दिवसांनंतर बदलण्यात आली. दररोज तेच जेवण दिले जात असल्यामुळे खाण्याचा कंटाळा येत होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत दुसरा पर्याय नव्हता', असे त्यांनी सांगितले. 

सव्वा लाख खर्च
"हॉटेलने माझ्याकडून 87 हजार रुपये ऍडव्हान्स घेतला होता. दरवेळी स्वॅब टेस्टिंगचे 4500 रुपये घेतले जातात. मला क्वारंटाईनच्या काळात सव्वा लाख रुपये खर्च आला. मी घरीच क्वारंटाईन होतो, अशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. मात्र त्यांनी 14 दिवस हॉटेलात ठेवले. हा अनुभव माझ्यासाठी त्रासदायक होता', अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या