महाराष्ट्र राज्य ‘सुपर मॅग्नेटिक पॉवर’

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

महाराष्ट्रात कोरोना काळात प्रचंड मोठी गुंतवणूक आली असून आपले राज्य हे ‘सुपर मॅग्नेटिक पॉवर’ असल्याचा अभिमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना काळात प्रचंड मोठी गुंतवणूक आली असून आपले राज्य हे ‘सुपर मॅग्नेटिक पॉवर’ असल्याचा अभिमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत आज विविध गुंतवणूकदारांशी झालेल्या करारप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, विविध क्षेत्रांत काम करणारे उद्योजक हे महाराष्ट्र परिवाराचे सदस्य आहेत. जग कोरोनासंकटाचा सामना करत असताना आपल्या मंडळींनी विश्वास टाकून जी गुंतवणूक केली आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपली मंडळी बरोबर असली की हत्तींचे बळ मिळते ,अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

एक वर्षात म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात २ लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली. त्यातील १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक कोरोनाकाळातील आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘‘महाराष्ट्राच्या या कामगिरीकडे संपूर्ण देश एक उदाहरण म्हणून बघेल. राज्यावर विश्वास दाखवत जी गुंतवणूक येथे झाली त्याबद्दल उद्योजकांचे मनापासून आभार मानायची गरज आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्येक उद्योजकाशी एक उद्योगमित्र जोडून दिला हे अत्यंत अभिनंदनीय पाऊल आहे. मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत याबद्दल आभार!  राज्य आणि देशाप्रतीची निष्ठा अत्यंत महत्वाची आहे,’’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. या वेळी परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

संबंधित बातम्या