नाशिक जिल्ह्यात महिन्याला दीडशे महिला बेपत्ता

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

अनेकांचा शोध गुलदस्त्यातच; सहा महिन्यात 752 महिलांची नोंद

संतोष विंचू 
येवला

घरातून रागाने, मित्राबरोबर, कोणी फूस लावून तर कोणी विवाह करण्याच्या हेतूने....कारणे काहीही असोत पण नाशिक जिल्ह्यात महिन्याला सरासरी दीडशे महिला बेपत्ता होत आहे. गेल्या सहा महिन्यात लॉकडाऊन असतानाही 1 हजार 226 जण बेपत्ता झाले. विशेष म्हणजे यात 752 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यातील बहुतांश महिलाचा शोध अद्याप लागला नसल्याचे पोलिस नोंदीवरून दिसून आले आहे.

हरवत चाललेला कौटुंबिक संवाद, पालक- मुलांतील संवादाचा अभाव, पती- पत्नीतील विसंवाद, कौटुंबिक ताणतणाव, शिवाय तरुणाईत प्रेमाचे वाढलेले आकर्षण, छोट्याश्‍या गोष्टीवरून ही मुला-मुलींचे घर सोडण्याचे प्रकार घडतात. शिवाय महिला-मुली अनेकदा प्रलोभनांनाही बळी पडून त्यात फसतात. अशा अनेक कारणांमुळेच महिलांचे हरवण्याचे प्रमाण जास्त आहे किंबहुना काही महिला तर एखादा रॅकेटच्या ही बळी पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामुळे बेपत्ता झालेल्यांच्या तक्रारीत महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
2016 ते 2018 या काळात देशात महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र देशातील टॉपचे राज्य राहिले आहे. 2018 मध्ये नाशिक जिल्ह्यातून 1011 महिला बेपत्ता झाल्याने पहिल्या दहा जिल्ह्यात नाशिकचा समाविष्ट होता. शहर व जिल्ह्यात 2014 ते 2017 या कालावधीत 2702 महिला व युवती बेपत्ता झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतरही हे आकडे वाढतच असून लॉकडाऊनच्या तीन महिन्यात सुद्धा नाशिकमधून सुमारे 400 महिला बेपत्ता झाल्या आहेत. जानेवारी ते जून 2019 या सहाच महिन्यात जिल्ह्यातून 852 महिला बेपत्ता झाल्या होत्या. हाच आकडा आता 2020 मध्ये सर्व काही बंद असतांनाही 752 वर पोहोचला आहे. पोलिस यंत्रणेने अनेक महिलांचा शोध लावलाही आहे, पण हरवलेल्या काही महिला मात्र वर्षानुवर्षे बेपत्ताच आहे.

नाशिक मधून बेपत्ता महिला... (जानेवारी ते जून या काळातील)
पोलिस हद्द - वर्ष 2019 -- 2020
नाशिक शहर - 396-------- 313
नाशिक ग्रामीण - 456 ------- 413

राज्यातील बेपत्ता महिला
वर्ष 2016 - 28, 316
वर्ष 2017 - 29, 279
वर्ष 2018 - 33, 964

"महिलांचा बेपत्ता होण्याचा विषय गंभीर आहे. कारणे काहीही असो पण परिस्थितीनुरूप ही वेळ येत असली तरी महिलांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आकडे धक्कादायक असून महिला बेपत्ता होणार नाही, यासाठी शासन स्तरावरूनच दखल घेण्याची गरज आहे.'
- नीलिमा पाटील, मालेगाव

संबंधित बातम्या