pvt bus
pvt bus

राज्यभरात फक्त 178 खासगी बसची तपासणी

मुंबई

लॉकडाऊनच्या काळात गुजरात, राजस्थानमधील वाहनांतून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे पुढे आल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते; परंतु आतापर्यंत फक्त 178 बसगाड्यांची तपासणी झाली असून 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यात ई-पास आणि परमिट नसलेल्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे उघड झाले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकाडाऊन झाल्यानंतर मुंबईसह राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. याचा गैरफायदा घेऊन गुजरात आणि राजस्थानमधून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक सुरू होती. खासगी वाहतूकदार विना ई-पास, विनापरमिट बसगाड्या चालवत होते. प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते आणि प्रवाशांची जादा वाहतूक केली जात होती. त्यावर कारवाई होत नसल्याने मुंबई मोटर वाहन संघटनेनेच या वाहनांची धरपकड सुरू केली होती.
त्यामुळे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक तक्रारी आल्यावर परिवहन आयुक्तांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते; परंतु राज्यासह सीमा तपासणी नाक्‍यांवर वाहनांच्या तपासणीचा देखावाच होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे परप्रांतीय अवैध प्रवासी वाहतूकदारांना वाचवण्यात येत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

फक्त 25 वाहनांची तपासणी
राज्यातील सीमा तपासणी नाक्‍यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. 2015 मध्ये तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी ट्रकचालक बनून आच्छाड सीमा तपासणी नाक्‍यावर छापा टाकला होता. त्या वेळी सुमारे 22 लाख रुपये अतिरिक्त आढळल्यामुळे ठाणे विभागाच्या आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. राज्यातील 22 सीमा तपासणी नाक्‍यांवरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असताना 15 जूनपासून फक्त 25 वाहनांची तपासणी करण्यात आल्याचे समजते.

ठिकाण एकूण तपासलेली वाहने- जप्त केलेली वाहने - परमिट नसलेली वाहने - ई-पास नसलेली वाहने - जादा प्रवासी वाहतूक करणारी वाहने
- मुंबई महानगर प्रदेश - 54 - 15 - 21 - 34 - 11
- राज्यातील एकूण - 99 - 33- 41 - 55 - 25
- सीमा चेक पोस्ट - 25 - 2 - 9 - 7 - 3
- एकूण - 178 - 50 - 71 - 96 - 39

मुंबई बसमालक संघटनेने गेल्या तीन दिवसांत सुमारे 175 वाहने पकडून दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा अनेक वाहनांना आरटीओ अधिकाऱ्यांनी समज देऊन सोडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक वाहने परप्रांतीय असल्याने आता जप्तीची कारवाई कशी करणार? नाशिकमधील पेठ सीमा तपासणी नाक्‍यावरून छुप्या मार्गाने अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे.
- हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बसमालक संघंटना

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली. त्यामुळे सर्व मार्गांवरील अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली आहे.
- पुरुषोत्तम निकम, उपायुक्त, राज्य परिवहन विभाग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com