औरंगाबादेत कोरोनाचे तीन बळी, आतापर्यंत ३४ मृत्यू

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

मदनी चौक, पैठणगेट, बुढीलेन येथील तिघांचा समावेश 

औरंगाबाद

औरंगाबादेत कोरोनाचा कहर संपता संपेना. ‘कोरोनासुरा’ने रविवारी (ता. १७) तीन बळी घेतल्यानंतर सोमवारी (ता. १८) आणखी तिघांचा बळी गेला. मदनी चौक येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठणगेट येथील ५६ वर्षीय महिला आणि बुढीलेन येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृतांत समावेश आहे. या तिघांनाही कोरोनाच्या लागणशिवाय इतर व्याधीही होत्या, अशी माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. 

३२ वा बळी
मदनी चौक येथील ६५ वर्षीय रुग्णाला कोरडा खोकला आणि ताप होता. त्यांना कटकटगेट येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १३ मे रोजी त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १६ मे रोजी ‘घाटी’त सायंकाळी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते; पण १७ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता 

३३ वा बळी
पैठणगेट येथील ५६ वर्षीय महिलेला १७ मे रोजी ‘घाटी’त दाखल केले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांचा १८ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना कोविडसह मधुमेहाचाही आजार होता. 

३४ वा बळी
बुढीलेन येथील ४२ वर्षीय पुरुषाला १४ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा त्याच दिवशी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा १८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाबही होता.

संबंधित बातम्या