साताऱ्यात एकाच दिवशी चौघांचा मृत्यू

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

एका कोरोनाग्रस्तासह तीन संशयित; दोन महिन्यांच्या बालकाचा समावेश

सातारा

वरोशी (ता. जावळी) येथील कोरोना बाधिताबरोबरच दोन महिन्यांच्या बालकासह तीन संशयितांचा आज श्‍वसनाच्या तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू झाला. या तिघांचे अहवाल अद्याप आले नसले, तरी एकाचा दिवशी चौघांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 159 जणांना जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
गेल्या चार दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज सकाळी मात्र एक बाधित, तीन संशयितांसह चौघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. मृत्यू झालेल्यांमध्ये जावळी तालुक्‍यातील कोरोनाबाधित असलेल्या 58 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णाला मधुमेह व श्‍वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. 
संशयितांमध्ये मृतांमध्ये वरळी (मुंबई) येथून प्रवास करून आलेली पाचगणीतील 64 वर्षीय महिला, घाटकोपर (मुंबई) येथून प्रवास करून आलेले दोन महिन्यांचे बालक, तसेच नांदलापूर (ता. कऱ्हाड) येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. पाचगणीची महिला ही होम क्वारंटाइन होती. तिला दमा व हृदयविकार होता. श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दोन महिन्यांच्या बालकाला कऱ्हाडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. नांदलापुरातील महिलेला कऱ्हाडमध्ये संशियत म्हणून दाखल करण्यात आले होते. या तिघांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असून, त्याचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 34, कृष्णा हॉस्पिटलमधील 35, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 53, वाई ग्रामीण रुग्णालयातील 9, तर कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 15 जणांचा समावेश आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत 159 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  

आठ लढवय्यांची कोरोनावर मात 
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरीही दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा धडाकाही सुरू आहे. आजही आठ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यातील सात रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल व कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मलकापूर, वनवासमाची, आगाशिवनगर व कऱ्हाडातील मंगळवार पेठेतील रुग्णांचा समावेश आहे. बरा झालेल्या आठवा रुग्ण हा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला दहिवडी (ता. माण) येथील युवक आहे.

सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ खुली
जिल्हाधिकाऱ्यांनी चौथ्या लॉकडाउनमध्ये शासनाने दिलेल्या सुविधा कालपासून (ता. 21) जिल्ह्यात लागू केल्या. त्यामुळे सर्व ठिकाणची दुकाने उघडली गेली; परंतु सातारा शहरातील राजपथ, कर्मवीर भाऊराव पथ व माजी राज्यपाल गणपतराव तपासे मार्ग (राधिका रस्ता) प्रतिबंधित जाहीर केले होते. त्यामुळे आज या ठिकाणची दुकाने उघडता आली नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पहिला आदेश मागे घेत हे रस्ते आज मोकळे केले. त्यामुळे या रस्त्यांवर असलेली साताऱ्याची मुख्य बाजारपेठ खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित बातम्या