अमानुष...!; जळगावमध्ये चार चिमुकल्यांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

चारही मुलांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनास्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक पोहोचले आहे. जिल्ह्याचे  पोलिस अधीक्षकही घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती आहे.   

रावेर- शहरानजीकच्या बोरखेडा रस्त्यावरील शेतात एक सालदाराचे घर आहे. यातील चार लहान अल्पवयीन मुलांची अमानुष  हत्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे रावेर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चारही मुलांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनास्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक पोहोचले आहे. जिल्ह्याचे  पोलिस अधीक्षकही घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती आहे.   

रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्‍तफा यांच्या शेतात सालदार म्हणून काम करण्याऱ्या महताब आणि रुमली बाई भिल हे दांपत्य मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) या आपल्या मूळ गावी  गेले होते. त्यामुळे घरात चारही मुले एकटीच होती. त्यातील सईता (वय १२ वर्ष), रावल(वय ११ वर्ष), अनिल(वय ८वर्ष) आणि सुमन(वय ३ वर्ष) या चौघांची हत्या झाल्याचे शेत मालकाला सकाळी आढळून आले आहे.

याबाबत विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार यांच्यासह पोलिस यंत्रणा दाखल झाली आहे. 

पाच वर्षांपूर्वी जळगाव शहराजवळील भादली गावात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती. अद्यापर्यंत या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. त्यात आज याच प्रकारे झालेल्या हत्याकांडामुळे भादली हत्याकांडाची पुनारावृत्ती झाली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 

पोलिस अधीक्षक व श्वान पथक रवाना

गंभीर घटना असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक हे घनास्थळी रवाना झाले आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे घटनास्थळी उपस्थित आहे.

संबंधित बातम्या