400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय

अवित बगळे
शुक्रवार, 24 जुलै 2020

पर्यावरणाचे संवर्धन करूनच विकासकामे : आदित्य ठाकरे

मुंबई

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा सांगली जिल्ह्यातील भोसे येथील 400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या प्रकल्प संचालकांनी वटवृक्ष वाचवण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांस दिले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वृक्ष वाचवण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. तसेच याबाबत मंत्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकांनी हा वटवृक्ष वाचवण्यासाठी आंदोलन केले होते. या सर्वांची दखल घेत आता तो वाचवण्याचा निर्णय झाला आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले, की निर्णयाबाबत समाधान आहे. यापुढील काळातही राज्यातील कोणतीही विकासकामे ही पर्यावरणाचे संवर्धन करूनच केली जातील, याबाबत आपण स्वत: बारकाईने लक्ष ठेवून कार्यवाही करू. याबरोबरच या निर्णयाबद्दल मंत्री ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे तसेच सांगली जिल्हाधिकारी, महामार्ग प्रकल्प संचालक आणि उपविभागीय अधिकारी यांचे आभार मानले.

असा आहे वटवृक्ष
रत्नागिरी- कोल्हापूर- मिरज- सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चे काम सध्या सुरू आहे. मिरज ते पंढरपूर शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मौजे भोसे (तालुका मिरज, जि. सांगली) या गावातून जातो. या गावातील गट क्रमांक 436 येथे यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौरस मीटर आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरिता नैसर्गिक निवासस्थानदेखील आहे. नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वटवृक्ष तोडावा लागणार होता.

संबंधित बातम्या