मुंबईत 41 लाख मास्क जप्त

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचे उघड झाले आहे. फक्त मुंबईमध्ये पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये 41 लाख 17 हजार 605 मास्क आणि 18 हजार 676 सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
या मुद्देमालाची किंमत अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेली नाही. मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यातूनदेखील लाखो मास्क आणि सॅनिटायझर जप्त केले असून, त्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
या सर्व वैद्यकीय वस्तू डॉक्टर, नर्स, पोलिस आणि सफाई कर्मचारी यांच्यासह कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्वांना उपलब्ध करून देण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांकडून मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत साठेबाजी झालेल्या 21 ठिकाणी पोलिसांनी जप्तीची कारवाई केली असून त्यातील 21 जणांविरोधात गुन्हे देखील दाखल केले आहेत. 
लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात या दोन्ही वस्तू मुबलक प्रमाणात मिळत नव्हत्या. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांनी या वस्तूंचा साठा करून ठेवला होता. त्यातून कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने या दोन्ही वस्तू चढ्या दराने विकल्या जात होत्या. त्यामुळे पोलिसांनी छापा टाकून संबंधित मुद्देमाल जप्त 
केला आहे.

पुण्यात 18 हजार मास्क जप्त 
मुंबईसह पुण्यातदेखील मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार झाला. पोलिसांच्या युनिट 1 ने केलेल्या कारवाईत 18 हजार मास्क जप्त केले आहेत.

याबाबत याचिका दाखल केली, त्यावेळी त्यात तीनच कारवायांचा उल्लेख होता. त्यातील एक पुण्यातील व दोन मुंबईच्या होत्या. त्यात जप्त केलेला मुद्देमाल हा 15 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे राज्यभरातील कारवायांचा विचार केल्यास हा आकडा मोठा आहे.
-अॅड. हर्ष पार्टे

संबंधित बातम्या