मुंबईत येणारे 45 कोटींचे "म्यॅव म्यॅव' जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

अमली पदार्थांचे कारखानेही उद्‌ध्वस्त; तिघांना अटक

मुंबई

न्हावा-शेवा बंदरात एक हजार कोटींचे हेरॉईन जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका कारवाईत 250 किलो विविध अमली पदार्थ जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय) यश आले आहे. मुंबई व हैदराबादमध्ये विविध ठिकाणी छापे टाकून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 47 कोटी रुपये आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे
हैदराबादवरून ड्रग्स भरलेला कंटेनर मुंबईत येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. एका खासगी बसमध्ये कार्गो कंटेनरमध्ये ड्रग्स लपवण्यात आले होते. हैदराबादहून बस सुटताच डीआरआयने ड्रग्स पकडले. तपासात हे ड्रग्स मुंबईत येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई व हैद्राबादमध्ये राबवलेल्या शोध मोहिमेत 250 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यात 210 किलो मेफेड्रॉन, 10 किलो केटामाईन व 31 किलो एम्फिटामाईनचा समावेश आहे. मेफेड्रॉन हे रासायनिक ड्रग्स असून ते कोकेनसारखा नशा देते. म्यॅव म्यॅव म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. जप्त केलेल्या म्यॅव म्यॅवची किंमत 45 कोटी होती. केटामाईन हे पार्टी ड्रग्स असून त्याला डेट रेप ड्रग्सही बोलतात. याप्रकरणी मुंबईतील रासायनिक प्रयोगशाळा व हैद्राबादमधील रासायनिक कारखानाही डीआरआयने उद्‌ध्वस्त केला असून एका सराईत आरोपीसह तिघांना अटक केली. आरोपीने राहत्या घरातच प्रयोगशाळा उभी केली होती. मुख्य आरोपीला 2017 मध्येही ड्रग्स तस्करीत अटक करण्यात आली होती.

मुंबईतून देशभर पुरवठा
हैद्राबादमध्ये ड्रग्स बनवून ते मुंबईत पाठवण्यात येणार होते. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याचा पुरवठा करण्यात येणार होता, असे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी रॅकेटचा परदेशापर्यंत पुरवठा साखळी आहे. त्याचा सर्व व्यवहार हवाला मार्फत होत असल्याचे डीआरआयने सांगितले आहे. कारवाईत 45 लाख रुपयांचे भारतीय व परदेशी चलनदेखील जप्त करण्यात आले.

संपादन- अवित बगळे
 

संबंधित बातम्या