बेकायदा बांधकामांबाबत मुंबईत ९४ हजार तक्रारी

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कंगना राणावतच्या पाली हिल येथील बंगल्यावर झालेल्या कारवाईनंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

मुंबई:  कंगना राणावतच्या पाली हिल येथील बंगल्यावर झालेल्या कारवाईनंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कंगना समर्थकांकडून मुंबईतील झोपड्यांचे छायाचित्र व्हायरल केले जात असून यांच्यावर कधी कारवाई करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत बेकायदा बांधकामांबाबत तब्बल ९४ हजार ८५१ तक्रारी आल्या होत्या. त्यातील १२ हजार १५७ तक्रारींचा पालिकेने निपटारा केला असून पाच हजार ४६१ बांधकामांवर कारवाई केली आहे.

महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन यंत्रणा उभारली आहे. त्यावर २०१६ ते ८ जुलै २०१९ पर्यंत ९४ हजार ८५१ तक्रारी आल्या होत्या. त्यातील पाच हजार ४६१ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ९४ हजार तक्रारींपैकी ४२ हजार ६९७ तक्रारी दुसऱ्यांदा करण्यात आल्या, असा दावा महापालिकेने केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली होती. 

मुंबईत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जाते, असा दावाही त्यांनी केला आहे. मुंबई महापालिका दरवर्षी १५ ते १६ हजार बेकायदा बांधकामांना नोटीस देते. त्यातील फक्त १५ ते २० टक्के बांधकामांवर कारवाई होते.

 

संबंधित बातम्या