दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने झाला अपघात; वायरमन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक (वय 45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने अपघात झाला आहे.

सावंतवाडी: भरवस्तीत बिबट्या फिरत असून वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दिवसेंदिवस आरोस येथिल भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढतच आहे. गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक (वय 45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने अपघात झाला आहे. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज येथे (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. ही घटना काल (ता.7) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली आहे.

दांडेली-आरोसमार्गे कोंडुरा रस्त्यावर गवे व बिबट्याचा वावर कायम असतो. गुरूवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वायरमन दीपक नाईक आपल्या घरी गिरोबावाडी येथून आरोस बाजार येथे जात होते. रात्रंदिवस ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी त्यांची प्रामाणिक तळमळ असते. आरोस मधलीवाडी येथे अचानक त्यांच्या दुचाकीला बिबट्याची धडक बसली. यात नाईक यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांना अपघाताची बातमी समजताच त्यांनी तातडीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी येथे हलविण्यात आले; परंतु नाईक यांना गंभीर अपघात झाल्याने अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.

दीपक नाईक हे शुध्दीत आल्यानंतरही वाघ वाघ असे ओरडत असल्याचे त्यांच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. डॉक्‍टरांच्या प्रयत्नांना यश येत असून दीपक नाईक हे उपचारास प्रतिसाद देत आहेत. या अपघातात त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली.

ग्रामस्थांमध्ये संताप

आक्रमक पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांनी दीपक नाईक यांच्या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘झोपी गेलेल्या वनविभागाला जाग कधी येणार आणि भरवस्तीत फिरणाऱ्या अशा धोकादायक प्राण्यांपासून आमचे रक्षण कधी करणार’  असा प्रश्न उपस्थित केला आहे. आरोस गावात रानटी प्राण्यांपासून कोणत्याही ग्रामस्थांचे नुकसान किंवा इजा झाल्यास ते थेट कार्यालय गाठणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आणखी वाचा:

नावात काय आहे? एकाच वॉर्डात दोन महिला उमेदवारांच्या पतींना नावाचाच झालाय ताप -

 

भरवस्तीत बिबट्या किंवा रानटी प्राणी घुसून ग्रामस्थांना त्रास देण्याचे अनेक प्रकार गावात घडले आहेत. वनविभागाला वारंवार सांगूनही याकडे ठोस उपाययोजना होत नसल्याने अशा अपघातांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. निदान रात्रीच्यावेळी तरी वनविभागाने गस्त घालणे आवश्‍यक आहे.

- महेश आरोसकर, पोलिसपाटील-आरोस

संबंधित बातम्या