आरोपी कोरोनाबाधित; 10 पोलिस क्वॉरंटाईन

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

चेंबूर येथे इलेक्‍ट्रॉनिक दुकानातील चोरीच्या प्रकरणात अटक

मुंबई

चेंबूर येथील इलेक्‍ट्रॉनिक दुकान फोडून साडेपाच लाखांच्या वस्तू पळवणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी पाच आरोपी कोरोनाबाधित असल्याचे समजल्यावर 10 पोलिसांना विलगीकरणात जावे लागले आहे.
चेंबूर येथील शेल कॉलनी मार्गावरील एका इलेक्‍ट्रॉनिक दुकानाच्या गोदामाचे कुलूप 30 मे रोजी रात्री एका टोळीने तोडले. गोदामातील सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू घेऊन चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघड झाल्यावर दुकानाच्या मालकाने नेहरूनगर पोलिसांत तक्रार केली. घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांच्या पथकांनी कोरोना महामारीच्या काळातही कसून तपास केला आणि पाच दिवसांत सात आरोपींना अटक केली. चौकशीत सातही आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
त्या वेळी आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल आल्यानंतर सर्व आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या सर्व आरोपींना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या आरोपींच्या संपर्कात आलेल्या व त्यांची चौकशी करणाऱ्या दोन पोलिस पथकांमधील दोन अधिकारी आणि आठ कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. एका पोलिस पथकाने या आरोपींची चौकशी केली होती; तर दुसऱ्या पथकाने त्यांना न्यायालयात नेले होते.
 

संबंधित बातम्या