अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून शिवसेनेत

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

काँग्रेसच्या राजकारणात त्यांनी सक्रिय सहभाग फार घेतला नाही. मात्र, शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी त्यांचे नाव देण्यात आल्याने राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले होते. 

मुंबई- अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी  काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज दुपारी मातोश्रीवर दाखल होत रश्मी ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून त्यांनी प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली.यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

दुपारी 4 वाजता त्या पत्रकार परिषद घेणार असून यात त्या काँग्रेसमधील कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

 मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी उर्मिला यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत मुंबई उत्तरमधून निवडणूकही लढवली होती. मात्र, यात त्यांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्या काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात त्यांनी फार सहभाग घेतला नाही. मात्र, शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी त्यांचे नाव देण्यात आल्याने राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले होते. त्या काँग्रेस सोडून शिवसेनेत जाणार अशी चर्चा यानंतर सुरू झाली होती.

मुंबईत पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवेश महत्वाचा मानला जात असून. उर्मिला या राजकारणात आल्यापासून आपण मुंबईकर असल्याचे ठणकावून सांगतात त्यामुळे निवडणुकांमध्ये शिवसेनेला त्यांच्या रूपाने एक सेलिब्रिटी प्रचारक आणि आक्रमक नेता मिळाला आहे. 
 

संबंधित बातम्या