बहुतांश चाकरमान्यांचा गणेशोत्सव यंदा मुंबईतच

अनिश पाटील
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

ई-पाससाठी पोलिसांकडे फक्त 4 हजार अर्ज

मुंबई

कोरोना संकटामुळे बहुतांश चाकरमान्यांनी गावी जाण्याऐवजी यंदा मुंबईतच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांकडे गणेशोत्सवासाठी गावी जाण्याकरिता ई-पाससाठी केवळ 4 हजार अर्ज आले आहेत. खासगी अथवा भाडेतत्त्वावरील गाड्यांसाठी गेल्या पाच दिवसांत हे अर्ज करण्यात आल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी सुमारे सहा लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गेले होते.
लॉकडाऊनदरम्यान गणेशोत्सवासाठी गावी जाणे सोयीच व्हावे, यासाठी ई-पास काढताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. यापूर्वी अत्यावश्‍यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबंधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठीच ई-पास मिळत होता. त्यात गणेशोत्सवाचा पर्यायही सामील झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला; मात्र गेल्या पाच दिवसांत मुंबईतून इतर जिल्ह्यात गणेशोत्सवाकरिता जाण्यासाठी मुंबई पोलिसांना केवळ चार हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील बहुतांश अर्ज कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे आहेत. फक्त खासगी वाहनाने जाणाऱ्यांसाठी हा पास देण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा फार कमी आहे.
याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक उपायुक्तांना ई पासचे अधिकार देण्यात आले होते. पास देण्यात विनाकारण दिरंगाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पहिल्या अर्जास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ई-पास देण्यात येत होते. गावी गेल्यानंतर चाकरमान्यांना प्रथम 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्यामुळे 12 ऑगस्टला ही सुविधा बंद करण्यात आली आहे; पण या पाच दिवसांत केवळ चार हजार ई-पाससाठी अर्ज आले आहेत.

कोरोना संकटात गावी गेल्यास क्वारंटाईन राहावे लागते. तेथे कशी व्यवस्था असेल, याची माहिती नाही. तसेच माझे वडील 72 वर्षांचे आहेत. त्यांना अशा परिस्थितीत गावी नेणे धोकादायक असल्यामुळे या वर्षी आम्ही चुलत भावंडांनी मुंबईतच गणपती आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- आशीष गावडे, चाकरमानी

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या