रुग्णवाहिका मिळाली; पण बाबा जगातून गेले...

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

घरीच राहा; सुरक्षित राहा; मृताच्या मुलाचा नागरिकांना संदेश

मुंबई

"बाबांना यकृताचा आजार होता. चार दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू होते. महापालिकेचे डॉक्‍टरही व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या रुग्णालयाच्या शोधात होते. अखेर पहाटे 3 वाजता रुग्णवाहिका आली; मात्र त्याआधीच बाबा या जगातून गेले होते...' कोरोनामुळे दगावलेल्या पवईतील रुग्णाचा मुलगा ही करुण कहाणी सांगत होता. पवईतील 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. या दु:खात असतानाही, "घरीच राहा, सुरक्षित राहा' असा संदेश त्याने नागरिकांना दिला. 
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने इतर आजारांच्या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नाहीत. रुग्णाला खाट मिळेपर्यंत कोरोनाचा संसर्ग होतो. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते. त्यात रुग्णालयात जागा मिळणे आणि जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होणे अत्यंत जिकिरीचे ठरत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा समोर आले. पवईतील या 65 वर्षांच्या रुग्णाला मार्चच्या पहिल्या आठवड्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी डॉक्‍टरांनी त्यांचे यकृत निष्क्रिय होत चालल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. 
अंथरुणाला खिळलेल्या या ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती चार दिवसांपासून ढासळत चालली होती. कोव्हिड-19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या मुलांच्या काळजाचा ठोका चुकला. महापालिकेच्या डॉक्‍टरांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल होण्याबाबत सुचवले. तेव्हापासून रुग्णाची मुले, नातेवाईक आणि परिसरातील कार्यकर्ते रुग्णवाहिका मिळवण्याच्या प्रयत्नात होते. "शनिवारी सकाळपासून महापालिकेचे डॉक्‍टर आणि रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्नात होतो. रविवारी पहाटे 3 वाजता डॉक्‍टर आणि रुग्णवाहिका आली; परंतु त्याआधीच रुग्णाचे निधन झाले होते', असे सामाजिक कार्यकर्ते कैलाश कुशेर यांनी सांगितले. 

दु:खातही एवढेच सांगेन
"बाबांची स्थिती मिनिटामिनिटाला खालावत होती. महापालिका डॉक्‍टर आणि इतरांनीही प्रयत्न केले. अखेरीस त्यांचा मृत्यू झालाच. दु:खातही एवढेच सांगेन, "घरी राहा, सुरक्षित राहा', असे आवाहन रुग्णाच्या मुलाने नागरिकांना केले आहे.

संबंधित बातम्या