राळेगणसिद्धीच्या कामातून अण्णा हजारे निवृत्त

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

विजयादशमीचे औचित्य साधत, पद्मावती मंदिरात कोरोना संकटामुळे सात महिन्यांनी प्रथमच रविवारी हजारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

राळेगणसिद्धी-‘‘गावात १९७५मध्ये कामाला सुरुवात केली. जवळपास ४५ वर्षांचा काळ लोटला. गावातील सगळे कार्यकर्ते आज जे काम करीत आहेत, ते पाहून, प्रत्यक्षात काम करताना जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा अधिक आनंद आता होतो. यापुढेही मी काम सुरू ठेवले, तर कार्यकर्ते गहाळ पडतात. तसे होऊ नये, यासाठी राळेगणसिद्धीच्या कामातून हळूहळू निवृत्त होत आहे,’’ अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

विजयादशमीचे औचित्य साधत, पद्मावती मंदिरात कोरोना संकटामुळे सात महिन्यांनी प्रथमच रविवारी हजारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.  हजारे म्हणाले, ‘‘गावात एकाच्या घरी मोटारसायकल आली तरी सगळे गाव पाहायला जमायचे, अशी परिस्थिती होती. पाणलोटक्षेत्र विकासामुळे आज गावाची परिस्थिती बदलली. सामुदायिक विवाह चळवळ १९८०मध्ये सुरू केली. त्या वेळी पाणीटंचाई असल्याने तहसीलदारांना सांगूनही पाण्याचे टॅंकर आले नाही. मी उपोषण सुरू केल्यावर, हंडे घेऊन महिला आंदोलनात आल्या. नंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येऊन माफी मागितली.’’

माझा शेजारी, माझा गाव, माझा समाज, यांच्यासाठी माझे काही तरी कर्तव्य असल्याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे हजारे म्हणाले.

गरजूंसाठी ट्रस्ट उभारा

गावातील हुशार व होतकरू मुला-मुलींच्या उच्चशिक्षणात पैशांअभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सात-आठ जणांचा ट्रस्ट स्थापन करावा. गावातून १० लाख लोकवर्गणी जमा झाली, तर माझे स्वतःचे अडीच लाख रुपये ट्रस्टसाठी देईन. दर वर्षी त्यातून मदत होऊन मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी सूचना हजारे यांनी केली.
 

संबंधित बातम्या