कुणी मोबाईल देता का मोबाईल

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये झोपडपट्टीतील आदिवासी विशाल पावरा समोरील प्रश्‍न

कापडणे

घर, आसरा मिळण्यासाठी ‘कुणी घर देता का घर?, एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्‍या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगला जंगलात हिंडतंय. जिथून कुणी उठवणार नाही, अशी एक जागा धुंडतंय. कुणी घर देता का घर?’ हे स्‍वगत आहे ‘नटसम्राट’ या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर या पात्राचे. असहाय्य स्‍थितीत त्‍यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्‍न आहे. हे सगळं नाटकात घडलं. परंतु असाच काहीसा प्रश्‍न एका आदिवासी समूहातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन शिक्षणप्रणालीमुळे आला आहे. हुशार आहे, शिकण्याची जिद्द आहे; परंतु गरिबीमुळे ‘कुणी मोबाईल देता का मोबाईल’, हे म्‍हणण्याची वेळ आली आहे.
कापडणे शेतशिवारातील झोपडीत राहणाऱ्या विशाल पावराने जवाहर नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करून नवोदय विद्यालयात प्रवेश झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे शाळेचा ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. मात्र, महिन्याभरापासून विशालचा अभ्यास बुडत आहे. त्याच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही. त्याला हवाय मोबाईल. विविध संकटातून पुढे जाणाऱ्या छोट्या विशालची इतरांसाठी छोटी वाटणारी संकटे त्याच्यासाठी विशालमय झाली आहेत.
विशाल पावरा आणि मुकेश पावरा या दोन्ही झोपडीतील मित्रांनी नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. झोपडीत राहणाऱ्या ‍या मित्रांचे यश सर्वसुविधांमध्ये राहणाऱ्या ‍विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन भरणारेच आहे.

संबंधित बातम्या