सहायक पोलिस आयुक्तावर खंडणीचा गुन्हा

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

दोन युवकांकडून घेतले 40 हजार रुपये; गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

भुईंज

वाईतील गोळीबाराच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी आणलेल्या दोघांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने 40 हजार रुपयांची खंडणी मागितली. वाई येथे पोलिस उपअधीक्षकपदी सेवा बजावलेले व सध्या पुणे शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या दीपक हुंबरे याच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वाई येथे आपसातील वरर्चस्वावरून दोन टोळ्यांत टोळीयुद्ध झाले होते. त्यात गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, तो फरारी आहे. त्याबाबत भुईंज येथील काही युवकांची भुईंज पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. त्या दरम्यान सक्तीच्या रजेवर असतानाही दीपक हुंबरे हे पोलिस गणवेशात भुईंज पोलिस ठाण्यात येऊन गेले व परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर संबंधित तरुणांना फोन करून भुईंज बस स्थानकात बोलावले. "भुईंज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्‍याम बुवा यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. तुम्हाला यात काही त्रास होणार नाही. माझे काय करता बोला, अन्यथा या गुन्ह्यात अडकावावे लागेल,' अशी भीती दाखवली. फिर्यादी व त्याच्या मित्राने "तुमचे किती द्यायचे सांगा,' असे विचारले असता हुंबरेने 50 हजार रुपये सांगितले. त्यावर फिर्यादीने "इतके पैसे नाहीत' म्हटल्यानंतर त्याने प्रत्येकी 20 हजार देण्यास सांगितले. महामार्गावर "जोशीविहीर येथे उड्डाण पुलाखाली पैसे घेऊन या' असे त्यांना सांगितले. तेथून फिर्यादी व त्याच्या मित्राने घरी जाऊन प्रत्येकी 20 हजारांप्रमाणे 40 हजार रुपये जोशीविहीर येथे जाऊन हुंबरेला दिली. या घटनेची तपास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा करीत आहेत. 

संबंधित बातम्या