पून्हा बेळगाव महापालिकेसमोर लाल-पिवळा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

बेळगावच्या मराठी भाषिकांचा मानबिंदू असलेल्या महापालिका कार्यालयासमोर लाल-पिवळा झेंडा फडकविण्याची आगळीक सोमवारी कन्नड संघटनेने केली.

बेळगाव: बेळगावच्या मराठी भाषिकांचा मानबिंदू असलेल्या महापालिका कार्यालयासमोर लाल-पिवळा झेंडा फडकविण्याची आगळीक सोमवारी (ता. २८) कन्नड संघटनेने केली. महापालिकेच्या सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हा प्रकार घडला. श्रीनिवास ताळूकर व कस्तुरी भावी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांशी यावेळी पोलिसांची झटापट झाली.

सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आठ ते दहा कन्नड कार्यकर्ते ध्वजस्तंभ व लाल पिवळा झेंडा घेऊन अचानक महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. त्यांनी तो झेंडा तेथे फडकविला. कन्नड प्रसारमाध्यमांना त्यांनी याची माहिती दिली होती. पण, पोलिस अनभिज्ञ होते. घटनेची माहिती मिळताच मार्केटचे पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने तेथे पोचले. त्यांनी तो स्तंभ व झेंडा 
हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कन्नड कार्यकर्ते व पोलिसांत झटापट झाली.

त्यावर लागलीच कन्नड कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीत म्हणण्यास सुरवात केली. शिवाय त्यांनी ध्वजाची दोरी आपल्या गळ्यात अडकून घेत पोलिसांना प्रतिकार केला. या घटनेनंतर महापालिका परिसरातील पोलिस  बंदोबस्त वाढविण्यात आला. आयुक्त के. एच. जगदीश यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह तेथे जाऊन ध्वज हटविण्याची विनंती केली. पण, ताळूकर व त्याच्या सहकाऱ्यांनी ध्वज हटविण्यास विरोध केला. एवढेच नव्हे तर महापालिका अधिकारी, पोलिस व बेळगावच्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. लाल पिवळ्या पट्ट्या बांधून महापालिकेचे संपूर्ण प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न कन्नड कार्यकर्त्यांनी केला. पण पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.

आरटीओ सर्कलमधील मराठी फलकाला २४ डिसेंबर रोजी काळे फासणाऱ्या कस्तुरी भावी व ताळूकर यांनी नियोजनबद्ध रितीने महापालिकेसमोर लाल पिवळा ध्वज फडकविला. याआधीही महापालिकेवर लाल-पिवळा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न झाला आहे. पण त्यात यश मिळाले नव्हते.

संबंधित बातम्या