रामदेव बाबांवर सर्जिकल स्ट्राईक; कोरोनिलबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

रामदेव बाबांच्या पतंजली समूहाने कोरोनाच्या उपचारावर म्हणून बाजारात आणलेल्या कोरोनिल औषधावरून वाद आता चांगलाच पेटला आहे.

रामदेव बाबांच्या पतंजली समूहाने कोरोनाच्या उपचारावर म्हणून बाजारात आणलेल्या कोरोनिल औषधावरून वाद आता चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्रात सरकारने कोरोनिल औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज याबाबत बोलताना, जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व यांसारख्या इतर सक्षम आरोग्य संस्थांकडून कोरोनिल औषधाला जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात या औषधाची विक्री होणार नसल्याचे सांगितले आहे. 

Coronavirus: अमिताब स्टाईलमध्ये केली मुंबई पोलिसांनी जनजागृती

मागील शुक्रवारी पतंजलीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांनी कोरोनाच्या उपचारावर कोरोनिल औषध बाजारात आणले होते. व त्यावेळेस देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. यावेळी कोरोनिल औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने देखील मान्यता दिली असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने यावर भाष्य करताना त्यांनी अशा कोणत्याही औषधाला कोरोनावरील औषध म्हणून मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर देशातील इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील या मुद्द्यावरून काही प्रश्न उपस्थित केले होते. 

इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनिल औषधाच्या संबंधित कोणतेही वैधानिक पुरावे नसताना खुद्द आरोग्यमंत्री यांनी जाहिरात करणे व या औषधाच्या वापरासाठी आवाहन करणे हे योग्य आहे का, असा सवाल केला होता. तसेच या औषधाच्या परिणामकारकतेबद्दल विचारताना कोणत्या व किती चाचण्या घेण्यात आल्या होत्या, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने विचारले होते. याशिवाय, कोरोनिल औषध कोरोनावर प्रभावी असेलच तर मग सरकार लसीकरणासाठी म्हणून 35 हजार कोटी रुपये का खर्च करत आहे, असा मोठा प्रश्न देखील इंडियन मेडिकल असोसिएशनने विचारला होता. 

अखेर संजय राठोडांनी मौन सोडलं; पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पहिली प्रतिक्रिया

त्यानंतर, आता महाराष्ट्र सरकारने राज्यात कोरोनिल औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये, इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, जागतिक आरोग्य संघटनेने देखील पतंजलीचा दावा फेटाळला असल्याचे म्हटले आहे. तसेच इतक्या घाई-घाईने औषध बाजारात आणणे व दोन जेष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी या औषधाला समर्थन देणे योग्य नसल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. याव्यतिरिक्त, इंडियन मेडिकल असोसिएशन, जागितिक आरोग्य संघटना व यांसारख्या इतर संस्थेकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नसल्याचे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.    

  

 

संबंधित बातम्या