फडणवीस यांच्या पत्रामुळे एसटी कामगार संघटना संतप्त

Dainik Gomantak
रविवार, 28 जून 2020

मुख्यमंत्री असताना लक्ष न घातल्याबाबत सवाल

मुंबई

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उघड्या डोळ्याने एसटी महामंडळातील गैरव्यवहार बघितला, 2017 मध्ये वेतनवाढीसाठी संपानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्याचे पत्र देऊन सहानुभूती घेण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न बुडत असल्याने एसटीचे प्रचंड नुकसान होत आहे. परिणामी महामंडळाकडे आता वेतनासाठी सुद्धा पैसे नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या सवलतीच्या प्रतिपूर्तीच्या रकमेतूनच कामगारांचे वेतन द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत महामंडळाने एसटी कामगारांना मे महिन्याचे वेतन 50 टक्केच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटना आधीच संतापल्या आहेत.
त्यानंतर यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली असून, फडणवीस यांनी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांना पत्र लिहून संपूर्ण वेतन देण्याची मागणी केली आहे. मात्र, फडणवीस यांची ही मागणी फक्त राजकारणापुरती असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला असून, फडणवीस यांच्या विरोधातही एसटी कर्मचारी संघटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळालेच पहिजे. ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पत्र राजकीय आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस.

ऑक्‍टोबर 2017 रोजी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीकरीता झालेल्या संपाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री, अधिकारी यांच्या समवेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कोणताही वेतनवाढीचा ठोस निर्णय घेतला नाही. आता मात्र पत्र देऊन पुतना मावशीचे प्रेम, सहानुभूती घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

एसटी कामगारांना 100 टक्के वेतन मिळावे, ही कामगार सेनेची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधाला विरोधाचे राजकारण न करता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला विशेष आर्थिक पॅकेज मिळवून द्यावे. जेणेकरून मे महिन्यासह त्यापुढील सहा महिन्यांचे 100 टक्के वेतन एसटी महामंडळाला देता येईल.
- हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना.

संबंधित बातम्या