'बेळगाव' ठरले कर्नाटकातील तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

बेळगावच्या सांबरा विमानतळावरुन ऑक्‍टोबरमध्ये सहाशेहून अधिक विमानफेऱ्यातून २६ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी ये-जा केली. बंगळूर व मंगळूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर बेळगाव राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ ठरले आहे.

सांबरा :  बेळगावच्या सांबरा विमानतळावरुन ऑक्‍टोबरमध्ये सहाशेहून अधिक विमानफेऱ्यातून २६ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी ये-जा केली. बंगळूर व मंगळूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर बेळगाव राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ ठरले आहे. गत १७७ दिवसांमध्ये १ लाख १३ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे.

विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीनुसार गत महिन्यात बेळगाव येथील विमानतळावरुन ६३४ विमान फेऱ्या झाल्या. त्यातून २६,१८३ प्रवाशांनी ये-जा केली. राजधानी बंगळूरचे विमानतळ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या स्थानी मंगळूर तर चौथ्या क्रमांकावर हुबळी विमानतळ आहे. विमानफेऱ्यांमध्ये बेळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने विमान प्रवास बंद होता. त्यानंतर विमानसेवा सुरू झाली. सध्या सुरु असलेल्या  बेळगाव येथील विमानफेऱ्यांचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. इंडिगो, स्पाईस जेट, ट्रू जेट, अलायन्स व स्टार एअर या कंपन्यांच्या सेवा सुरू आहेत. सध्या सांबरा विमानतळावरुन मुंबई, बंगळूर, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, पुणे, तिरुपती, कडप्पा, सुरत आदी शहरांना थेट विमानफेऱ्या 
सुरु आहेत.

संबंधित बातम्या