भंडारा जिल्हा रुग्णालय अग्नितांडव : चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

महाराष्ट्र सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता कक्षाला काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये १० बालके दगावली असून सात जणांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेमुळे अवघे राज्य सुन्न झाले आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कक्षातून रात्री अडीचच्या सुमारास धूर येत असल्याचे पाहून परिचारिकेने लगेच डॉक्टरांना माहिती दिली. यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग  नियंत्रणात आणली. होरपळल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला तर कक्षातील धुरामुळे श्वास गुदमरून इतर सात चिमुकले मरण पावले. या घटनेनंतर शेजारच्या कक्षातील इनक्युबेटर व इतर यंत्रसामग्री अन्यत्र हलवून पेइंग वॉर्डात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.

"भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप दहा बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत."
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र.

"संबंधित दुर्घटनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."
- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मुंबई : या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले. याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

आग प्रतिबंधक यंत्रणा नाही

या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते. रुग्णालयात आग तसेच इलेक्ट्रिकल सामग्रीचे ऑडिट करण्यासाठी ८ मे २०२० ला एक कोटी ५२ लाख रुपये खर्चाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, निधी मंजूर न झाल्याने ही कामे झालीच नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या