सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

शरद पवार यांची माहिती; फडणवीसांचा गौप्यस्फोट तथ्यहीन

मुंबई

सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. याउलट भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊन यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.
राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू, असा प्रस्ताव भाजपनेच दिला होता, असा खुलासा शरद पवार यांनी केला. पवार म्हणाले की, शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही. तुम्ही आम्हाला स्थिर सरकार बनवायला साथ द्या, असे काही भाजप नेते आमच्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. पंतप्रधानांसोबत माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा आणि मी त्या प्रस्तावाला संमती देईन, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा होती. ही बाब लक्षात आल्यावर पंतप्रधानांकडे माझ्याबद्दल किंवा पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी दिल्लीत जाऊन पतंप्रधानांची भेट घेतली. त्यांना स्पष्ट सांगितले, की आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. जमले तर शिवसेनेसोबत जाऊ किंवा विरोधी पक्षात बसू. हे सांगायला जाताना एक गृहस्थ माझ्याशेजारी होते, त्यांचे नाव संजय राऊत आहे. मोदींच्या चेम्बरमध्ये जात असल्याचे राऊतांना सांगून गेलो होतो. चेम्बरमधून बाहेर आलो तेव्हाही राऊत तिथेच होते, आल्यावर आतमध्ये काय झाले. हे राऊत यांना सर्व सांगितले, असेही पवार म्हणाले.

ऑपरेशन कमळ' म्हणजे सत्तेचा दुरुपयोग
भाजपचे लोक महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडायचे म्हणतात. सरकार पाडायचे म्हणणाऱ्यांना जनमानसात किती स्थान आहे, असा सवाल त्यांनी केला. भाजप नेते सुरुवातीला तीन महिन्यांत सरकार पाडायचा दावा करत होते. आता सहा महिन्यांत सरकार पाडू, असे म्हणत आहेत. भाजपचे "ऑपरेशन कमळ' म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. त्याचा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले.

उद्धव यांच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी
उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या कामाची पद्धत ही शिवसेनेची आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही बघतोय की त्या पक्षात आदेश येतो व नंतर त्या आदेशाची अंमलबजावणी होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे. आम्ही वरिष्ठांच्या मताचा आदर करतो. वरिष्ठांकडून आदेशच येतो, असे नाही. समजा एखाद्याने मत मांडले, तर आम्ही त्यावर चर्चा किंवा विचार करू शकतो. ही आमच्या कामकाजाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्याच रस्त्याने जायचे आणि अंमलबजावणी करायची, ही पद्धत अगदी लहान-थोरांपासून चालली आहे. याच्याबद्दल माझी तक्रार नाही. आताचे सरकार एकट्याचे नाही, तर तिघांचे आहे. या तिघांमध्ये जर दोघांची काही मते असतील, तर ती जाणून घेण्याची आवश्‍यकता आहे. लोकशाहीत आपसात चर्चा कायम ठेवली, तर बिघाडीची चर्चा रंगणार नाही.

प्रियांका गांधींचे घर काढणे हे क्षुद्रपणाचे राजकारण
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना दिल्लीचे निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले. एसपीजी सुरक्षा कमी केल्याने प्रियांका गांधी या घरात राहू शकत नाही, असे कारण देण्यात आले. याविषयी संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, हातातील सत्ता विनयाने वापरायची असते. प्रियांका गांधींना घराबाहेर काढण्यामागे सत्तेचा दर्प आहे. त्यांचे घर काढून घेणे हा राजकीय क्षुद्रपणा आहे.

संबंधित बातम्या