किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरूद्ध निवडणुक आयुक्तांकडे तक्रार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

किरीट सोमय्या यांनी काल भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांची दिल्लीतील कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी काल भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांची दिल्लीतील कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी त्यांच्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवली असल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी केली आहे. रविंद्र वायकर हे मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

अलिबागमधील कोर्लाई येथील 9.34 एकर जमीन व 19 घरे यासंबंधी चुकीची माहिती दिल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. सुपूर्द केलेल्या कागदपत्रांमध्ये अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमीनीचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली महाराष्ट्र पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. शिवसेना नेत्यांवर टिका करणाऱ्या विरोधकांमध्ये किरीट सोमय्या कायमच आघाडीवर राहिले आहेत. किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार असून, ईशान्य मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. सध्या ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.

 

संबंधित बातम्या