महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपचा धुव्वा

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

एकूण 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि 1 स्थानिक स्वराज्य संस्था यांसाठी राज्यात दोन दिवसांपूर्वीच मतदान पार पडले होते. यानंतर आज तीन पदवीधर मतदार संघांचे निकाल समोर आले असून यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

मुंबई- महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी घेण्यात आलेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. एकूण 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि 1 स्थानिक स्वराज्य संस्था यांसाठी राज्यात दोन दिवसांपूर्वीच मतदान पार पडले होते. यानंतर आज तीनही पदवीधर मतदार संघांचे निकाल समोर आले असून यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

धुळे-नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक सोडता पदवीधर मतदार संघांमध्ये भाजपच्या पदरी अपयशच आले आहे. शिक्षक मतदार संघांची मतमोजणी अद्यापही सुरू असून अमरावतीत अपक्ष उमेदवार अरूण सरनाईक हे आघाडीवर आहेत तर पुणे शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे जयंत आजगावंकर यांच्याकडेही निर्णायक आघाडी आहे.     

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली. यात,

  •  पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. भाजपने प्रतिष्ठेची केलेली ही जागा महाविकास आघाडीला आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. लाड यांनी देशमुख यांचा 48 हजार 824 मतांनी पराभव केला आहे. 
  •  भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदार संघातही भाजपला जोरदार धक्का बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला आहे.   भाजपसाठी 58 वर्षांपासून शाबूत असलेल्या मतदार संघात नागपूरचे संदीप जोशी यांचा त्यांनी पराभव केला आहे.
  • औरंगाबाद पदवीधर मतदार संघातही महाविकास आघाडीच्याच उमेदवाराने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केला.
  • या निवडणुकीत धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकालच फक्त भाजपच्या बाजूने लागला आहे. येथे भाजपचे अमरिश पटेल यांनी पक्षाची इभ्रत राखत विजय मिळवला आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजप आणि महाविकास आघाडी एकमेकांविरूद्ध लढले आहेत. त्यात महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. 1 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. महाविकास आघाडी बरोबरच भाजपच्या नेत्यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.

 

संबंधित बातम्या