मुंबई पालिकेकडून कंगनाच्या ऑफिसला दणका तर न्यायालयाकडून बांधकाम पाडण्यास स्थगिती

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

संघ परिवाराचा पाठिंबा आणि केंद्राने दिलेले वाय दर्जाचे सुरक्षा कवच धारण करत कंगनाने आज मुंबईत एंट्री केली खरीपण येथेही तिला शिवसेनेच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

मुंबई: मायानगरी मुंबईच्या सेटवर आज बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तिच्या कथित बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेने तत्परतेने केलेली कारवाई आणि त्यानंतर न्यायालयाने दिलेली स्थगिती हाच विषय दिवसभर चर्चेत होता.

संघ परिवाराचा पाठिंबा आणि केंद्राने दिलेले वाय दर्जाचे सुरक्षा कवच धारण करत कंगनाने आज मुंबईत एंट्री केली खरीपण येथेही तिला शिवसेनेच्या विरोधाला सामोरे जावे लागले. रिपाई आणि शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत विमानतळ परिसर दणाणून सोडला होता. मुंबई महापालिकेने या लढाईत आणखी पुढचे पाऊल टाकत कंगनाच्या पाली  हिल्स येथील कथित बेकायदा बांधकामावर थेट बुलडोझर चालविले यामुळे हा संघर्ष आणखीनच चिघळला. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. 

मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत शिवसेनेने कंगनाच्या मुंबई दौऱ्याला विरोध करण्यासाठी एकीकडे तिचा खास आपल्या स्टाईलने विरोध करायचा आणि दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून तिच्या कथित बेकायदा बांधकामांना लक्ष्य करायचे अशी दुहेरी रणनीती शिवसेनेने आखली होती. कंगनानेही शिवसेनेला खास तिच्या शैलीत उत्तरे दिल्याने हा वाद आणखीनच पेटला. महापालिकेच्या कारवाईनंतर संतापलेल्या कंगनाने ‘लक्षात ठेव बाबर, पुन्हा मंदिर बनेल’ अशी ट्विट करत पुन्हा मातोश्रीच्या दिशेने तोफगोळे डागले.

उद्धव ठाकरे आणि करण जोहर, तुम्ही माझे कार्यालय तोडले, आता घर तोडणार आणि नंतर मलाही मारहाण कराल. मी जगेल अथवा मरेल, तुम्हाला उघडं पाडीनच. आज तुम्ही माझे घर पाडले, उद्या तुमचे पडेल. सरकार येतात आणि जातात. आज एका व्यक्तीने जीवन पणाला लावले, उद्या हजारोंचा जोहार होईल, जागे व्हा.  - कंगना राणावत, अभिनेत्री

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या