केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत मका, ज्वारी खरेदी

Dainik Gomantak
सोमवार, 11 मे 2020

राज्यात यापूर्वी रब्बी हंगामामध्ये भरड धान्याची खरेदी केली जात नव्हती. तथापि अनेक जिल्ह्यांमध्ये मका, रब्बीची जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती.

नाशिक

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे. या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या मका उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात यापूर्वी रब्बी हंगामामध्ये भरड धान्याची खरेदी केली जात नव्हती. तथापि अनेक जिल्ह्यांमध्ये मका, रब्बीची जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्याअनुषंगाने रब्बी हंगामात भरड धान्याची खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यात राज्यात 25 हजार टन मका आणि 15 हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी केंद्राची किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबविली जाते. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थामार्फत बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑफ मार्केटिंग फेडरेशन मुंबई व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात एफएक्‍यू दर्जाच्या ज्वारी व मक्‍याची खरेदी केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर खरेदी केंद्र
योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्या- त्या जिल्ह्यात खरेदी अभिकर्ता संस्थांच्या माध्यमातून आवश्‍यक त्या ठिकाणी खरेदी केंद्र उभारले जाणार आहे. मका व ज्वारीची आधारभूत किंमतीने खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीसाठी परवानगी दिली आहे.

असे असतील दर (प्रती क्विंटल)
मका : 1 हजार 760 रुपये
संकरित ज्वारी : 2 हजार 550 रूपये.
मालदांडी ज्वारी : 2 हजार 570 रूपये

संबंधित बातम्या