चाकरमान्यांचा ओघ सुरू

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

लांबलचक रांगा; गणपतीसाठी मुंबई, पुणेकरांची गर्दी

खारेपाटण

गणेशोत्सवासाठी 10 दिवसांचा क्‍वारंटाईन कालावधी निश्‍चित झाल्यानंतर मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांनी सिंधुदुर्गची वाट धरली आहे. यात खारेपाटण चेकपोस्टवर नोंदणी, आरोग्य तपासणीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सात ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्‍चित झाली आहे. तसे ठराव देखील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची धावपळ सुरू झाली असून खासगी आराम बस तसेच इतर वाहनातून आपापल्या गावी दाखल होत आहेत. आजपासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होऊ लागल्याने त्याचा ताण खारेपाटण चेकपोस्टवरील महसूल, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेवर आला आहे. गावी येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांची नोंदणी, ई-पास तपासणी, आरोग्य तपासणी, हातावर शिक्‍के मारणे, आवश्‍यकता वाटली तर कोविड रॅपिड टेस्ट या फेऱ्या पार पाडल्यानंतर चाकरमान्यांना सिंधुदुर्गात प्रवेश दिला जात आहे.
चेकपोस्टवर मोठ्या संख्येने चाकरमानी येत आहेत; मात्र नोंदणी आणि तपासणी केंद्रांवर अपुरी बैठक आणि मंडप व्यवस्था असल्याने दिवसभरात चाकरमानी आणि तेथील कर्मचाऱ्यांत वादंगाचेही प्रकार निर्माण झाले होते. गणेशोत्सव कालावधीत चाकरमान्यांचा ओघ वाढता असल्याने, त्यानुसार जादा कर्मचारी नियुक्‍त करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून व्हायला हवी होती, अशीही अपेक्षा चाकरमान्यांकडून व्यक्‍त झाली.

सुविधा नसल्याने चाकरमान्यांची गैरसोय
खारेपाटण चेकपोस्टवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून सिंधुदुर्ग प्रवेशासाठी तीन ते चार तास ताटकळत राहावे लागत आहे. या कालावधीत प्रवाशांना चेकपोस्ट परिसरात स्वच्छतागृह, शौचालय, पिण्याचे पाणी तसेच चहा नाश्‍त्याचीही सुविधा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना तेथील जंगलमयभाग आणि सुखनदीपात्रातच नैसर्गिक विधी करावे लागत आहेत. गणेशोत्सव कालावधीपुरती जिल्ह्यातील नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेची फिरती शौचालये चेकपोस्ट परिसरात ठेवावीत, अशीही मागणी होत आहे.

संबंधित बातम्या