श्रमिक ट्रेनमध्येच दिला गोंडस बाळाला जन्म

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

सुरत ते प्रतापगढ प्रवासादरम्यान घडली घटना

मुंबई

नऊ महिन्यांची गर्भवती असताना आपल्या राज्यात घरी जाण्याची आस लावून असलेल्या महिलेने विशेष श्रमिक ट्रेनमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सुरत ते प्रतापगढ प्रवासादरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती रतलाम विभागाला मिळताच गर्भवती मातेला रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये गर्भवती माता आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.
बुधवारी सुरत रेल्वे स्थानकावरून प्रतापगढसाठी 09637 या क्रमांकाची विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. यामध्ये 28 वर्षीय पूजा देवी आणि तिचे पती आनंद कुमार आपल्या कुटुबियांसह प्रवास करत होते. श्रमिक ट्रेनच्या इंजिनपासून चौथ्या डब्यात हे प्रवास करत असताना, पूजाला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे सह प्रवाशांनी यासंबंधित माहितीचे ट्विट करून पश्‍चिम रेल्वे विभागाला कळवले. रेल्वेच्या ट्विटर सेलने ही माहिती पश्‍चिम रेल्वेच्या रतलाम विभागाला दिली. त्यानंतर रतलाम रेल्वे स्थानकावर श्रमिक ट्रेन पोहचण्यापूर्वीच रेल्वेच्या आरोग्य विभागातील डॉक्‍टरांचा समूह आणि रुग्णवाहिका तैनात करून ठेवण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर गाडी सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी येताच रेल्वेच्या डॉक्‍टर अंकिता मेहता आणि त्यांच्या समूहाने रेल्वे डब्यात प्रवेश केला आणि महिलेची सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलेला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

पुढील प्रवासास रवाना
पूजाने एका गोड मुलाला जन्म दिला असून, एकदम सुखरूप असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर या श्रमिक ट्रेनला सकाळी 9 वाजून 43 मिनिटांनी पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आले असून, पूजा आणि त्यांच्या कुटुंबाने रेल्वेचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या