चिंतामणीची मूर्ती घडणार मंडपातच

Dainik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

चिंचपोकळी मंडळाकडून आगमन सोहळा रद्द; वर्गणीतून सरकारी रुग्णालयांना मदत

मुंबई

गिरणगावातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने (चिंचपोकळीचा चिंतामणी) यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंडपातच गणेशमूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकभावनेचा विचार करून व पोलिसांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून गणरायाचा आगमन सोहळा रद्द केला जाणार आहे.
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार गणेशमूर्ती बनवण्यात येईल. चिंतामणीची मूर्ती जागेवरच घडवण्याची तयारी मूर्तिकार रेश्‍मा विजय खातू यांनी दर्शवली आहे. काही पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून चिंतामणीचे पाटपूजन केले जाईल, मोठा सोहळा होणार नाही. या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे देण्यात येतील. त्याचप्रमाणे गरजू रुग्णांसाठी उपयुक्त साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल, असे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक यांनी सांगितले. प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांवर अतिरिक्त ताण पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

भाविकांना ऑनलाईन दर्शन
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणी दारांव्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सवाच्या कालावधीत विभागीय वर्गणीदारांसाठी ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व भक्तांना ऑनलाईन घडवण्यात येईल. त्यामुळे उत्सवाच्या काळात भक्तांनी गर्दी करू नये, असे आवाहन चिंचपोकळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे

संबंधित बातम्या