मुंबईत सिगारेटची तस्करी

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

खजुराच्या नावाखाली कंटेनरमध्ये साडेअकरा कोटींच्या सिगारेट
लॉकडाऊनमध्ये मागणी वाढल्याने दुबईहून तस्करी; दोघांना अटक

अनिश पाटील
मुंबई

खजुराच्या बॉक्‍समध्ये लपवून परदेशी सिगारेटची तस्करी करणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, न्हावा-शेवा बंदरातून साडेअकरा कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये परदेशी सिगारेटची मागणी प्रचंड वाढल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मनीष शर्मा (31) व सुनील वाघमारे (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते दोघेही मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमध्ये परदेशी सिगारेट लपवून आणण्यात आल्याची माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शोध घेतला असता या कंटेनरमधील 600 मास्टर बॉक्‍समध्ये परदेशी सिगारेटची 32 हजार 640 खोकी असल्याचे उघड झाले.
जप्त करण्यात आलेल्या 71 लाख 61 हजार 600 परदेशी सिगारेटची किंमत 11 कोटी 38 लाख रुपये आहे. दुबईवरून खजुराच्या नावाखाली परदेशी सिगारेटचा साठा मुंबईत आणला गेला होता. लॉकडाऊनच्या काळात मागणी प्रचंड वाढल्यामुळे या सिगरेट चढ्या भावाने विकून मोठा नफा कमावण्याचा या टोळीचा कट होता; परंतु त्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आले.

अशी होती कार्यपद्धत
मनीष शर्मा विजेचे बिल, पॅन कार्ड अशा कागदपत्रांच्या आधारे सुनील वाघमारेच्या मदतीने बनावट कंपन्यांसाठी जीएसटी व आयात-निर्यात क्रमांक मिळवायचा. बनावट दस्तऐवज सादर करून ही तस्करी केली जायची.

संबंधित बातम्या