तेलतुंबडे, राऊत यांच्या अहवालाबाबत खुलासा करा

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मुंबई

शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे आणि महेश राऊत यांच्या कोरोना अहवालाबाबत खुलासा करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. दोघांच्याही अहवालात साम्य असले, तरी निदान मात्र भिन्न दिले आहे, असे आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले.
तेलगू कवी वर्वरा राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तेलतुंबडे आणि राऊत यांनीही कोरोना चाचणीची मागणी करणारी याचिका न्यायालयात केली होती. या याचिकेवर नुकतीच दूरचित्र संवादाद्वारे सुनावणी झाली. राऊत आणि तेलतुंबडे यांचे चाचणी अहवाल समान आले आहेत; मात्र राऊत यांचा अहवाल निगेटिव्ह दाखवण्यात आला आहे; तर तेलतुंबडे यांच्यामध्ये काही प्रमाणात लक्षणे दाखवलेली आहेत. दोन्ही अहवाल समान माहितीवर असताना भिन्न निष्कर्ष कसा, असा प्रश्‍न राऊत यांच्या वतीने ऍड. विजय हिरेमठ यांनी उपस्थित केला. हा अहवाल ग्राह्य धरू नये आणि अहवालाबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली आहे. हे अहवाल अन्य व्यक्तींचे नाहीत ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. याबाबत तळोजा कारागृहातून माहिती घेऊन दाखल करू, असे सरकारी वकील वाय. पी. याज्ञिक यांनी खंडपीठाला सांगितले. राव यांच्या सान्निध्यात कारागृहात असल्यामुळे चाचणी करून घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

संबंधित बातम्या