कोरोनामुळे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आठवडाभर पूर्ण लॉकडाउन

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अचलपूर शहर वगळता संपूर्ण आठवडाभर पूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अचलपूर शहर वगळता संपूर्ण आठवडाभर पूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावेळेस आवश्यक सेवा राहणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. देशातील इतर भागात कोरोनाचे संक्रमण कमी होत असतानाच महाराष्ट्रात मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शाळा पुढील 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, जिल्ह्यात जमावात बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू ? पुढच्या आठवड्यात निर्णयाची शक्यता

यवतमाळ जिल्ह्यात लग्न कार्यक्रम, हॉटेल्स आणि धामिर्क स्थळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याठिकाणी 50 टक्के मर्यादा पाळण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉल काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. अमरावती आणि यवतमाळ येथे संशोधकांना दोन नवीन कोरोना संबंधित स्ट्रेन आढळल्याची माहिती मिळाली आहे. परंतु ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमधील कोरोनाची नवीन स्ट्रेन नसल्याचे संबंधित यंत्रणेकडून समजते. पूर्वीच्या तुलनेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर, देशातील बर्‍याच राज्यांत कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासन पुन्हा चिंताग्रस्त झाले आहे.

काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असल्यामुळे गेल्या 22 दिवसांत देशात काल 14 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर 100 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल केरळमध्ये दररोज कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे म्हटले होते. तसेच महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले होते. याव्यतिरिक्त, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशातही कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सहा हजार आणि केरळ मध्ये पाच हजार रुग्णांची भर पडली आहे. आणि छत्तीसगडमध्ये 259, पंजाबमध्ये 383 आणि मध्य प्रदेशात 297 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या