मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावर काँग्रेसने स्पष्ट केली आपली भूमिका

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणानाचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला आहे.

भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणानाचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला आहे.  मुंबई आणि राज्यातील कायदा व सुव्यस्थेबद्दल प्रश्न निर्माण करणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांचा या प्रकरणात समावेश असल्याने काँग्रेसने सुरुवातीला शांत राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत होते. मात्र आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. 

मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; दोघांना घेतले ताब्यात  

देशात ज्या ज्या राज्यांत भारतीय जनता पक्ष सत्तेत नाही, तिथे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून षडयंत्र रचत सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. या प्रकरणावर बोलताना सचिन सावंत यांनी भाजप शासित गुजरात राज्यात झालेल्या काही प्रकरणांचा संदर्भ दिला. आणि भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातचे पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा अमित शहा यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला. 

तसेच संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा गंभीर केले होते, तेव्हा नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला होता का ? असे म्हणत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकारवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे सचिन सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासोबतच भारतीय जनता पक्ष स्वतःसाठी आणि विरोधी पक्षासाठी वेगवेगळे मापदंड वापरत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे सचिन सावंत आणि काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीमागे गंबीरपणे उभे राहिल्याचे आज पाहायला मिळाले.  
 
याव्यतिरिक्त, गोदी मीडियाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी पुढे पत्रकार परिषदेत केला. व ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते या प्रकरणात कुठलीही हालचाल होताच एका पाठोपाठ एक प्रतिक्रिया देत आहेत, त्यावरून एखाद्या पटकथेप्रमाणे सर्व सुरु असल्याचे वाटत असल्याचे सचिन सावंत म्हणाले. यानंतर, सुशांतसिंह प्रकरणात देखील भारतीय जनता पक्षाने केंद्रीय यंत्रणांचा असाच वापर केला होता आणि त्यामधून मुंबई पोलिसांच्या बदनामी साठी प्रयत्न केले होते, असे ते यावेळी म्हणाले. याशिवाय, या प्रकरणात जे धमक्यांचे मेल आले ते 56 इंचांचे सरकार असणाऱ्या राज्यातल्या तिहार जेल मधुन आले असून, तिथे मोबाईल कसे पोहोचले असा गंभीर प्रश्न देखील सचिन सावंत यांनी उपस्थित केला. व एकूणच भारतीय जनता पक्षाने सरकार पाडण्यासाठी रचलेले हे एक षडयंत्र असल्याची भूमिका सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या आरोपावर अनिल देशमुख यांनी उत्तर देताना, अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचा थेट संबंध येत असल्याचे म्हटले आहे. तसेच परमबीर सिंग यांना याचे कनेक्शन आपल्यापर्यंत पोहचतील अशी भीती वाटत असल्यामुळेच त्यांनी आपल्यावर आरोप केले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या