सीपीआरमधून कोरोनाबाधित पळाला

Dainik Gomantak
गुरुवार, 25 जून 2020

इचलकरंजीतील घरातून पकडून पुन्हा आणले कोल्हापुरात

इचलकरंजी

कुडचे मळ्यातील 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने आज सीपीआर कोविड रुग्णालयातून पळ काढला. रिक्षा करून थेट त्याने येथील घर गाठले. या गंभीर प्रकारानंतर परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक प्रशासनही हडबडले. तरी तातडीने कारवाई करीत त्याला घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पालिकेच्या रुग्णवाहिकेतून पुन्हा सीपीआर रुग्णालयात रवानगी करण्यात आली.
संबंधित व्यक्ती यंत्रमाग कामगार आहे. ती कुडचे येथे राहते. त्याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आयजीएम रुग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह होता. त्याच्यावर तेथेच उपचार सुरू होते; मात्र आज दुपारी तो सीपीआरमधून पळाला. रिक्षाने थेट कुडचे मळ्यातील घरी दाखल झाला.
जिल्हा प्रशासनाने तातडीने ही माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेटे रुग्णवाहिकेसह कुडचे मळ्यात दाखल झाले. त्याला घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुन्हा सीपीआरकडे पाठविण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रकारामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.

पैसेही गेले अन्‌ संकटही ओढावले
बाधिताने रिक्षाचालकास 700 रुपये भाडे ठरविताना घरी गेल्यानंतर पैसे देण्याची हमी दिली. शहरात जास्त फिरावयास लागल्याने रिक्षाचालकाने जादा 100 रुपयांची मागणी केली. प्रत्यक्षात घरी पोहचल्यानंतर रिक्षातील प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे समजताच रिक्षाचालकालाही धक्का बसला. त्याने प्रवासाचे ठरलेले पैसे न घेताच तेथून धूम ठोकली. संबंधित रिक्षाचालक कोल्हापुरातील सोमवार पेठेतील असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली.

शेजारील चौघांचा संपर्क
घरी परतल्यानंतर बाधित रुग्णाने शेजारच्या घरातून आपल्या घराची किल्ली घेतली. त्यामुळे शेजारील घरातील चौघे जण त्याच्या संपर्कात आले आहेत. खबरदारी म्हणून चौघांनाही आयजीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

संबंधित बातम्या