एक्‍स-रेद्वारे होऊ शकेल कोरोनाचे निदान

Dainik Gomantak
रविवार, 17 मे 2020

"ईएसडीएस'चे संशोधन : महाराष्ट्र, केरळसह परदेशांत चाचण्या होणार सुरू

अरुण मलाणी
नाशिक

कोरोनाची लक्षणे आढळली की स्वॅब घेतला जातो. लॅबमध्ये या स्वॅबवर निरीक्षण करून निदान केले जाते. मात्र या प्रक्रियेला वेळ व खर्च अधिक आहे. त्यातवर उपाय म्हणून नाशिकच्या ईएसडीएस सॉफ्टवेअ सोल्यूशन प्रा. लि. यांनी छातीच्या एक्‍स-रेद्वारे कोरोनाचे निदान करण्यासंदर्भात संशोधन केले आहे. चाचणीतील 6 हजार 300 रूग्णांच्या एक्‍स-रेद्वारे अचुकतेचे प्रमाण 95.5 टक्‍के इतके राहिले आहे. सध्या महाराष्ट्रासह केरळ व अन्य काही देशांत या तंत्राद्वारे चाचणी केली जाणार आहे.
गेल्या दीड महिन्यापासून ईएसडीएस यांच्यामार्फत हे संशोधन सुरू होते. यात प्रामुख्याने डेटा सायंटीस्ट व रेडिओलॉजिस्ट अशा तज्ज्ञ मंडळीने सहभागी होत संशोधन केले. या दरम्यान सुमारे पन्नास हजार संशयीतांच्या एक्‍स-रेची तपासणी करण्यात आली. त्यातून कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या 6 हजार 300 रूग्णांपैकी 95.5 टक्‍के रूग्णांबाबतचे अचुक निदान या तंत्राद्वारे करण्यात यश आले. या संशोधनासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही माहिती दिलेली असून, त्यांनीही तंत्रज्ञान अवलंबाविषयी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासोबत केरळ व अमेरीका, युके अशा विविध देशांमध्ये ईएसडीएसमार्फत अशा स्वरूपातील तपासणी केली जाणार आहे. सध्या काही देशांमध्ये अशा प्रकारे एक्‍स-रेचा अभ्यास करून कोरोनाचे निदान केले जात असले तरी भारतातील हा पहिलाच प्रयत्न आहे.

कमी खर्चात होईल निदान
सध्या लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी प्रती व्यक्‍ती सुमारे साडे चार हजार रूपये खर्च येत असतो. परंतु एक्‍स-रे तपासणीद्वारे अवघ्या दोन-तीनशे रूपयांत संभाव्य धोका तपासता येणार आहे. ज्या व्यक्‍तींमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याचे निदर्शनात आल्यास केवळ अशा व्यक्‍तींची स्वॅब चाचणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. यातून नमुने तपासणीवरील भार कमी होतांना, दुसरीकडे खर्चातही मोठी बचत होऊ शकेल.

असे आहे संशोधन
या संशोधनाअंतर्गत संबंधित व्यक्‍तीच्या छातीचा एक्‍स-रे काढून तो ऑनलाईन पोर्टलवर संबंधित रेडिओलॉजिस्ट लॉगइन आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अपलोड करतील. व त्यानंतर काही मिनीटांत एक्‍स-रेचा अहवाल प्राप्त होण्यास मदत होईल. यामुळे संबंधितास कोरोनाचा धोका असल्यास तातडीने उपचार प्रक्रियेत सहभागी करून घेता येणे शक्‍य होईल. यासाठी साकारलेले पोर्टल हे मशीन लर्निंग व आर्टीफिशल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या आधारे काम करते.

एक्‍स-रेद्वारे कोरोनाचे संभाव्य निदानाची प्रणाली अत्यंत उपयुक्‍त ठरू शकते. सध्या आम्हाला 95.5 टक्‍के अचुकता मिळालेली असली तरी त्यात आणखी सुधारणांवर आमचा भर आहे. सोमवार (ता.18) पासून या तंत्राद्वारे चाचण्यांना सुरवात होईल. सार्वजनिक ठिकाणांवर अशी चाचणी केल्यास संशयीतांना उपचार प्रक्रियेत आणणे सुलभ होईल.
-पीयुष सोमाणी,
संस्थापक व सीईओ, ईएसडीएस.

संबंधित बातम्या