Corona Guideline: रंगूया सुरक्षेच्या रंगात! मुंबई महापालिकेने ट्विट करून शेअर केले परिपत्रक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

अशातच येत असणारा सर्वांचा आवडता सण  म्हणजे होळी. याच सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने होळी आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी साजरी करण्याबद्दल मुंबईत नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भारतासह राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच राज्याची महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतच आहे. मुंबईत कोरोना रूग्ण मृत्यूदराचा दर कमी असला तरी रूग्णवाढीचा वेग मात्र वरच्या दिशेने वाढतांना दिसत आहे. अशातच येत असणारा सर्वांचा आवडता सण  म्हणजे होळी. याच सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने होळी आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी साजरी करण्याबद्दल मुंबईत नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी 28 मार्चला साजरा होणारा 'शिमगोत्सव' आणि २९ मार्चला साजरा होणारा 'धुलिवंदन' व 'रंगपंचमी' हा उत्सव खाजगी आणि सार्वजनिक ठीकाणी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मुंबई महापालिकेकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठीकाणी होळी आणि रंगपंचमी साजरी न करण्याच्या आदेशांबरोबरच 'मी जबाबदार' या मोहिमेअंतर्गत हा उत्सव साजरा करणे टाळावे असे आवाहन पालिकेकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट करून एक परिपत्रक सोशल मिडियावर पोस्त केले आहे. होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यावर निर्बंध लावण्यात आल्याची माहिती या ट्विटमधून मुंबईकरांना देण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली? वाचा निर्मला सीतारमण काय म्हणाल्या 

"मुंबईला सुरक्षेच्या रंगात रंगवूया! कोरोनाविषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता यावर्षी शिमगोत्सव आणि धुलिवंदन/रंगपंचमी खाजगी त्याचबरोबर सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल", अशी सक्त ताकीदच या ट्वीटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच, मी जबाबदार हा हॅशटॅगही ट्वीटसोबत शेअर करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने परिस्थिती पुन्हा चिंताजनक होताना दिसते आहे.

दरम्यान, आजच्या दिवसात मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत 3 हजार 512 नव्या रूग्णांची वाढ झाली. तर 1 हजार 203 रूग्ण बरे होऊन घरी गेले. मात्र 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत एकूण 27 हजार 672  पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. दररोज वाढणाऱ्या रूग्णांच्या आकडेवारीमुळेच मुंबई पालिकेने होळी साजरी करण्यास मनाई केली असून मी जबाबदार या मोहिमेंअंतर्गत प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखावी असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या