सिंधुदुर्ग किल्ल्यात कोरोना ‘टाळेबंदी’चा प्रभाव शून्य!

सिंधुदुर्ग किल्ल्यात कोरोना ‘टाळेबंदी’चा प्रभाव शून्य!

सिंधुदुर्ग किल्ल्यात कोरोना ‘टाळेबंदी’चा प्रभाव शून्य!

किल्ल्यातील रहिवासी सादीक शेख यांची माहिती

योगेश दिंडे


पणजी, ता. २४ ः सध्या कोविड -१९ मुळे संपूर्ण जग टाळेबंदीच्या विळख्यात आहे. ही टाळेबंदी प्रत्येकाला असह्य झालेली आहे. मात्र, सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवाशांना नित्य नेमाने दरवर्षी नैसर्गिक टाळेबंदीचा सामना करावा लागतो. ही टाळेबंदी येथील साऱ्यांच्याच परिचयाची आहे. वर्षानुवर्षे दरवर्षी पावसाच्या कालावधीतील या टाळेबंदीचे नाविन्य किल्लावासीयांना नसून याचा आमच्यावर कोणताही प्रभाव झालेला नाही. मात्र, या टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने त्याचा गंभीर आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघाचे कार्यकारिणी सदस्य, व्यावसायिक तथा पर्यटन मार्गदर्शक सादिक शेख यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
सध्या सर्वसामान्य माणूस टाळेबंदीमुळे मेटाकुटीस आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग किल्ल्यातील नेमक्या स्थितीचा आढावा घेताना शेख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्यास दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन लाखांच्या घरात पर्यटक भेट देतात. यातील मार्च ते मे या कालावधीत सुमारे ८० ते ९० हजार पर्यटक भेट देतात. यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे पर्यटन व्यवसाय मंदावला. त्यामुळे काहीशा आर्थिक चणचणीचा सामना आम्हाला करावा लागला. पर्यटन हंगामात किल्ल्यात ८ कोल्ड्रिंक्सची व १ शुभेच्छा वस्तूंचे दुकान असते. या सर्व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
किल्ल्यातील सध्याच्या दैनंदिन जीवनशैलीबाबत शेख म्हणाले, किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महारांच्या श्री राजेश्‍वर मंदिरात नित्यनेमाने संकपाळ कुटुंबियांकडून पूजा-अर्चा सुरू असते. तीन ते चार महिन्यांच्या धान्यसाठ्‍याची पावसाळ्यापूर्वीच आम्ही तजवीज करतो. त्यामुळे टाळेबंदी असली काय किंवा नसली काय याचा फारसा फरक आम्हाला दैनंदिन जीवन जगताना जाणवत नाही. कारण किल्ल्यामध्येच आम्ही मुळा, वांगी, पडवळ, दोडका, गवार, कारले, भोपळा, भेंडी, माटाची भाजी पिकवतो. येथील काही घरांमध्ये कुक्कुटपालन केले जाते. किल्ल्यात सुमारे २०० माड आहेत. त्यापैकी प्रत्येक कुटुंबाच्या वाट्‍याला सरासरी २ किंवा ३ माड येतात. उंदीर-घुशींमुळे माडाचे उत्पन्न कमी-जास्त मिळते. काही वर्षापूर्वी पावसाळा संपेपर्यंत आमचा जगाशी संपर्क नसायचा. पण आता मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून कुटुंब, मित्रांशी आम्ही संवाद साधू शकतो. हाच एक जगण्यातील बदल म्हणता येईल, असे शेख म्हणाले.
आयुर्वेदिक उपचारावर भर
ऐनवेळी उद्भवणाऱ्या आरोग्य समस्येबाबत शेख म्हणाले, पावसाळ्यापूर्वीच प्रत्येक कुटुंब मालवणातील फॅमिली डॉक्टरकडून आवश्‍यक औषधे आणून ठेवतात. किरकोळ आजारावर पारंपरिक पद्धतीच्या आयुर्वेदिक उपचारावर भर दिला जातो. जर अतिगंभीर आजाराची समस्या उद्भवलीच तर मग किल्ल्यात आमच्याकडील पारंपरिक दोन होड्या आहेत. त्यांचा वापर करून मालवण किनारा गाठला जातो. शक्यतो अमावास्या, पौर्णिमेच्या दिवशी ओहोटीवेळी पद्मगड-दांडीमार्गे आम्ही मालवण किनाऱ्यावर जातो.
किल्ल्यातही अडुळसा...
किल्ल्यात अडुळसा, गुळवेल, पुनर्वा, कडून किराईत, दगडीपाला, कोरफड, एरंड, निरगुडीची व इतर अन्य औषधी झाडे आहेत. त्यांचा आजारात आवश्‍यकतेनुसार वापर केला जातो. येथे जांभूळ, पेरू, चिकूचीही झाडे आहेत.
तिन्ही विहिरी तुडुंब...
किल्ल्यातील दूधबाव, दहीबाव, साखर बाव सध्या पूर्ण भरलेल्या आहेत. येथील तीन तलावात पावसाचे पाणी साचते. मात्र, तलावाच्या भिंतीला गळती असल्यामुळे तलाव पूर्णपणे भरत नसल्याचे शेख यांनी सांगून या तलावांच्या डागडुजीची गरज व्यक्त करून या प्रश्‍नी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
आठ मांजरे, ३ कुत्रे
किल्ल्यामध्ये एकूण १८ घरे असून एकूण २१ लोक आहेत. यापैकी ८ महिला असून तीन लहान मुले आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये २ महिला व २ पुरुष आहेत. यातील काही कुटुंबातील सदस्य मालवणात राहतात. विरंगुळ्यासाठी काही सदस्य गळ टाकून मासेमारी करतात. पाळीव प्राण्यांमध्ये सात ते आठ मांजरे असून ३ कुत्रे आहेत. हे सर्वजण आमच्या कुटुंबाचाच एक भाग झाले आहेत, असे शेख म्हणाले.

(संपादन - योगेश दिंडे)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com