कोरोनाबाधितेला चालवत नेण्याचा प्रकार

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुपारी चार वाजता अहवाल आल्यानंतर दीड तासाने रुग्णास रुग्णालयात चालवत नेले आहे. तिच्यासोबत पालिकेचे कर्मचारी होते. ती गोष्ट उघडकीस येताच प्रमोद पाटील यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

कऱ्हाड

कोरोनाबाधित झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून न नेता त्यांना चालवत नेण्याचा प्रकार येथे घडला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला ऍम्ब्युलन्समधून न नेता चालवत नेले आहे. त्याची सखोल चोकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील मंगळवार पेठेतील प्रमोद पाटील यांनी केली आहे.
मागील सहा दिवसांत कोरोनाची तपासणी झालेल्यांचा दुपारी सव्वादोन वाजता अहवाल जाहीर झाला. त्यात मंगळवार पेठेतील महिला पॉझिटिव्ह आढळून आली. ती महिला घरीच क्वारंटाइन होती. मात्र, तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या वेळी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुपारी चार वाजता अहवाल आल्यानंतर दीड तासाने रुग्णास रुग्णालयात चालवत नेले आहे. तिच्यासोबत पालिकेचे कर्मचारी होते. ती गोष्ट उघडकीस येताच प्रमोद पाटील यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. श्री. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आरोग्य प्रशासनाने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला शहरातून चालवत नेणे भीतीदायक आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हिताचे नाही. शंभर टक्के लॉकडाउनमुळे नागरिक हैराण आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्णास चालवत नेण्याच्या प्रकारामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. तालुक्‍यात कोरोनाची साखळी प्रशासन अपयशी ठरले असतानाच शहरात पॉझिटिव्ह रुग्णास चालवत नेण्याचा प्रकार गंभीर आहे. संशयितांना केवळहोम क्वारंटाइन केले आहे. वास्तविक, त्यांना हॉस्पिटलाईज करायला पाहिजे होते. मात्र, तसे का केले गेले नाही. त्यात दोषी असणाऱ्या संबंधितावर योग्य कडक कारवाई करावी.

पॉझिटिव्ह रुग्ण आणण्याची जबाबदारी नागरी आरोग्य केंद्राच्या नर्सची असते. त्यांनी तो रुग्ण आणणार आहोत. रुग्णवाहिका हवी आहे, अशी उपजिल्हा रुग्णालयास माहिती द्यायला हवी होती. मात्र, तसे काहीच कोणी सांगितले नाही. त्या रुग्णास चालवत आणण्यात आले. रुग्ण प्रत्यक्ष उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर रुग्ण आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. ते योग्य नाही. वास्तविक कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. रुग्णांची माहिती उपजिल्हा रुग्णालयास कळाली, की त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते.

- डॉ. प्रकाश पाटील,
वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड

संबंधित बातम्या